१) कमलासारखे विशाल नेत्र असलेल्या माते मी तुला नमस्कार करतो. आपण भगवान श्रीविष्णुंच्या हृदयकमलांत निवास करता आणि या विश्वाची जननी आपणच आहात. कमलाच्या गर्भाप्रमाणे गोर्या वर्णाच्या हे क्षीरसागर कन्ये महालक्ष्मी आपण आपल्या शरणागतांचे रक्षण करणार्या आहात. आपण माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा.
२) मदन (प्रद्दुम्न) ची एकमात्र माता रुक्मिणीरुपधरिणी माते, आपण भगवान विष्णुच्या वैकुण्ठधामांत "श्री" नावाने प्रसिद्ध आहात. चंद्राप्रमाणे मनोहर मुख असणार्या देवि, चंद्रामधिल चांदणी आपणच आहात. तसेच सूर्याची प्रभा आपणच आहात. तीन्ही लोक आपणच प्रभावित करता. आपण आपल्या शरणागतांचे रक्षण करणार्या आहात. आपण माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा.
३) आपणच अग्निमधिल दाहक शक्ति आहात. ब्रह्मदेव आपल्याच सहाय्याने विविध प्रकारच्या विश्वाची रचना करतात. संपूर्ण विश्वाचे भरणपोषण करणारे श्रीविष्णु हे आपल्याच भरवशावर सर्वांचे पालन करतात. आपण आपल्या शरणागतांचे रक्षण करणार्या आहात. आपण माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा.
४) निर्मलरुप असलेल्या देवि, ज्यांचा आपण त्याग केलेला आहे त्याचाच भगवान रुद्र संहार करतात. वास्तविक आपणच या जगताचे पालन, संहार आणि निर्माण करता. आपणच कार्य-कारण स्वरुप जगत आहात. हे निर्मलस्वरुप लक्ष्मी, आपल्याला प्राप्त करुनच भगवान श्रीहरि सर्वांना पूजनिय झाले. आपण आपल्या शरणागतांचे रक्षण करणार्या आहात. आपण माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा.
५) हे शुभे, ज्या पुरुषावर आपला कृपाकटाक्ष होतो, या संसारांत तोच एकमात्र शूरवीर, गुणवान, धन्य, मान्य, कुलीन, शीलवान तसेच अनेक कलांचा ज्ञाता आणि परम पवित्र मानला जातो.
६) हे देवि, आपण क्षणभरसुद्धा ज्या पुरुषांत, हत्तीत, घोड्यांत, स्त्रैण, तृण, सरोवर, देवमन्दिर, घर, अन्न, रत्न, पशु-पक्षी, शय्या अथवा भूमिवर राहता तेच या जगांत शोभायमान होते दुसरे काहिही नाही.
७) हे विष्णुपत्नि! हे कमले, हे कमलालये, हे माता लक्ष्मि! आपण ज्याला स्पर्श करता ते पवित्र होते. आपण ज्याचा त्याग करता ते सर्व या जगांत अपवित्र होते. जेथे आपले नाव आहे ते उत्तम व मंगल आहे.
८) जे लक्ष्मी, श्री, कमला, कमलालया, पद्मा, रमा, नलिनयुग्मकरा (दोन्ही हातांत कमल धारण करणारी), मा, क्षीरोदजा, अमृतकुम्भकरा (हातांत अमृतचा कलश धारण करणारी), इरा आणि विष्णुप्रिया या नावांचा नेहमी जप करतात त्याना दुःख होत नाही.
९-१०) (या स्तुतिने प्रसन्न होऊन देवीने वर माग असे सांगितल्यावर अगस्ति मुनी म्हणाले हे देवि! ) माझ्याकडून केलेल्या या स्तुतिचा जे भक्तिपूर्वक पाठ करतील त्याना कधि संताप होणार नाही तसेच दरिद्रता येणार नाही. त्याना जे इष्ट आहे त्याचा त्याना वियोग होणार नाही. आणि त्याच्या धनाचा नाश होणार नाही. त्याना सर्वत्र विजय प्राप्त होवो आणि त्याच्या संततिचा त्याना कधि वियोग न होवो.
११) श्रीलक्ष्मी म्हणाली, हे मुने, जसे आपण इच्छिता तसेच होइल. या स्तोत्राचा पाठ माझी प्राप्ती (सांनिध्य) करुन देणारा होइल.
अशा रितीने श्रीस्कन्दमहापुराणांतील काशीखण्डांतील अगस्ति मुनिने केलेल्या महालक्ष्मीस्तुतिचा पाठ पुरा झाला.