लग्नाला उभे राहण्याआधी वधू अन्नपूर्णा आणि बाळकृष्णाची पूजा करते, हे दोन्ही शंकर आणि पार्वतीचे रूप मानले आहे. ही पूजा वधू बोहल्यावर जाण्याच्या पूर्वी करते. नवरदेव मिरवणूक काढत लग्न वेदीवर जाण्यासाठी निघतो.
या मूर्ती चांदीच्या असतात किंवा पितळ्याच्या असतात. पाटाजवळ नवीन समयी लावतात.ती झालीची विधी होईपर्यंत तेवत ठेवायची असते या साठी तिथे जवळ तेलाचे भांडे ठेवतात.तसेच जवळ हळद-कुंकवाचा करंडा आणि कुंकवाने रंगवलेल्या अक्षता एका वाटीत ठेवतात.तसेच त्या गौरीहार जवळ वर आणि वधू पक्षाचे सौभाग्यालंकार ठेऊन सुपलीचे 5-5 वाण ठेवतात.
तसेच पाटाच्या चारी बाजूला लाकडाचे कळस असलेले चार खांब वेगवेगळे मांडून एकमेकांना सूताने गुंडाळले जाते. गौरीहारच्या मागे आंब्याच्या पानांची डहाळी किंवा भिंतीवर आंब्याच्या पानाचे चित्र चिटकवतात. एका द्रोणामध्ये ओलं कुंकू आणि आंब्याची पाने ठेवतात जे आंबा पूजनासाठी उपयोगी येतात. अशा प्रकारे गौरीहार पूजेची तयारी केली जाते.
गौरीहार पूजा करण्यासाठी स्नान करून वधू मामाकडची पिवळी साडी नेसून गळ्यात मुहूर्तमणी ज्याला गळसरी देखील म्हणतात आणि मुंडावळ लावून पायात विरोदे घालून गौरीहार पुजायला बसते. गौरीहार पुजताना तिचे तोंड पूर्वेकडे असावे. बाळकृष्ण आणि अन्नपूर्णावर वधू थोड्या-थोड्या अक्षता वाहते आणि मंत्र म्हणते.गौरी-गौरी अक्षत घे येणाऱ्या धन्याला(धनी/वर) आयुष्य दे. असा मंत्र ती लग्नाच्या वेदीवर जाण्यापर्यंत म्हणते. नंतर मुलीला लग्नवेदीवर घेऊन जाण्यासाठी मामा येतो आणि तिला लग्नासाठी बोहल्यावर नेतो. लग्नानन्तर मुलगी सासरी आल्यावर या अन्नपूर्णा आणि बाळकृष्णाची स्थापना सासरच्या देवघरात केली जाते. आणि त्यांची दररोज पूजा केली जाते.