शतपथ ब्राह्मण ग्रंथात गाईच्या उत्पत्तीची कथा या प्रकारे सांगितली आहे. दक्ष प्रजापतीने प्राणी सृष्टी निर्माण केल्यानंतर थोडे अमृत प्राशन केले. त्या अमृताने ते संतुष्ट झाले. त्यावेळी त्यांच्या नाकातून बाहेर पडत असलेल्या श्वासाचा सुगंध सर्वत्र दरवळला. त्या श्वासातून एक गाय जन्मास आली. दक्ष प्रजापतीने सुंगधातून जन्मल्यामुळे तिचे नाव सुरभी असे ठेवले. सुरभीपासून अनेक गायी जन्मास आल्या. त्यामुळे सुरभी ही संपूर्ण गोवंशाची माता अर्थात जननी ठरली.