श्री कोकिळा माहात्म्य अध्याय पंधरावा

बुधवार, 19 जून 2024 (11:22 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥
धर्मराज म्हणे हरीस ॥ आणिक सांग कथा सुरस ॥ जे ऐकतां नासती किल्मीष ॥ ऐसी कथा सांगावी मज ॥१॥
आतां मजला तुम्हावीण ॥ कोण करील निवेदन ॥ आमुचा तूं केवळ प्राण ॥ न गमे तुजवीन आम्हासी ॥२॥
धर्मराज म्हणे श्रीहरी ॥ दमयंती किमर्थ व्रत करी ॥ तेच कथा निर्धारी ॥ सांगिजे मज यदुराया ॥३॥
हरी बोले तेव्हां वचन ॥ धर्मा होई सावधान ॥ नळदमयंती आख्यान ॥ आयकी आतां एकचित्तें ॥४॥
दमयंती असतां मातेचे घरीं ॥ अज्ञान अवस्था निर्धारी ॥ न करतां अन्याय तिजवरी ॥ आला असे कर्मभोग ॥५॥
आला एक ऋषी पवित्र ॥ दमयंती चोरित तयाचें वस्त्र ॥ न कळतां बुध्दी विचित्र ॥ निर्माण झाली ते ॥६॥
ऋषी म्हणे रायालागुन ॥ माझें वस्त्र नेलें चोरून ॥ न देतां श्रापीन मी ॥ तुम्हालागीं सर्वथा ॥७॥
रायें शोध केला बहुत ॥ वस्त्र कोठें न लागे निचित ॥ मग राव दमयंतीसी पुसत ॥ वस्त्र ठेविलें काय म्हणोनी ॥८॥
वस्त्र असे माझे जवळी ॥ मग ते आणोन दिधलें तये वेळी ॥ ऋषी क्षोभोन तत्काळीं ॥ श्राप देत तियेसी ॥९॥
ऋषी क्रोधे बोले वचन ॥ म्हणे तूं परम चांडाळीण ॥ तरी मी तुजला पुढें छळीन ॥ कलीरुप होऊनी ॥१०॥
श्राप देऊनी तये क्षणीं ॥ मुनी गेला आश्रमालागुन ॥ दमयंती भय न मानी मनीं ॥ अज्ञान अवस्था म्हणोनि ॥११॥
मग बहुत दिवस झालियावरी ॥ नळास दमयंती दिधली निर्धारीं ॥ लग्न झालीय़ा उपरी ॥ नळ घेऊणी गेला
दमयंतीते ॥१२॥
राज्य करी राजा नळ ॥ पुण्यप्रतापी धर्मिष्ठ केवळ ॥ हरिभजनी सदा सुशीळ ॥ प्रजापाळी यथाविधी ॥१३॥
नळ केवळ पुण्यपावन ॥ त्यांचे स्मरण करितां जन ॥ सप्त जन्मीचीं पातकें जाण ॥ भस्म होती क्षणार्धें ॥१४॥
पुण्याचा केवळ भांडार ॥ सत्वाचा तो केवळ गिरीवर ॥ धैर्याचा जैसा समर ॥ नळराजेश्वर पुण्यनिधी ॥१५॥
तीळभरी पाप जाण ॥ नसे राजयालागुन ॥ हरिभजनी अखंड जाण ॥ पुण्यपावन तो असे ॥१६॥
नळराजा एके दिवशीं ॥ बैसला होता सेभेसी ॥ तयेवेळीं शौच्यासी ॥ गेला तेव्हां राजेश्वर ॥१७॥
राजा करी पादप्रक्षालन ॥ संधींत कोरडे राहिले जाण ॥ तेणें राजयासी दोष लागू ॥ पापबुध्दी उपजली ॥१८॥
पाप संचरलें अंतरीं ॥ द्यूत खेळावें निर्धारी ॥ तो पूर्वीचा ऋषी ते अवसरी ॥ कर्णीं कली करील रुपें ॥१९॥
द्यूत खेळे राजेश्वर ॥ तो एक दुसरा खेळणार ॥ पुष्करनाम तयाचें निर्धार ॥ खेळे राजया बरोबर ॥२०॥
राजा न विचारी मनीं ॥ राज्य मांडिलें खेळावरी ॥ पुष्करें राज्य ते अवसरी ॥ जिंकोन राजा बाहेर घातला ॥२१॥
राजा निघतांची बाहेर ॥ मग मनी करी विचार ॥ म्हणे कर्मगती गहन थोर ॥ दशा कैशी हे जाहली ॥२२॥
उगाची कर कपाळीं लाउन ॥ मौन्येंची राजा करी रुदन ॥ भूमीवरी आंग टाकून ॥ क्षणएक निचेष्टित पडियेला ॥२३॥
दमयंतीही रुदन करी ॥ अंग कापतसे थरथरी ॥ अश्रुधारा ते अवसरी ॥ शोक करी दारुण ॥२४॥
दोघें करिती चिंता फार ॥ म्हणती कैसा करावा विचार ॥ कोठें जावें हा निर्धार ॥ करती झाले मनामाजी ॥२५॥
मग दोघेजण उठोन ॥ जाते झाले वना लागुण ॥ तेव्हां करुनी रुदन ॥ कर्मभोग विचित्र म्हणती ॥२६॥
चरणीं रुतती खडे कांटे ॥ जवळी जळ न मिळे कोठें ॥ शोक करती अति नेटें ॥ उष्ण शरीरीं लागतसें ॥२७॥
बहुत श्रम होती जाण ॥ मुखीं करती हरीचे चिंतन ॥ हळुहळु पंथ क्रमुन ॥ चालताती बहुश्रमीं ॥२८॥
तों दृष्टी देखिलें एक नगर ॥ नदी वाहे तेथें साचार ॥ त्या नदीचे उत्तरे तीरे ॥ बैसते झाले दोघे जण ॥२९॥
नळ राजा जळीं जाऊन ॥ धरुनी आणिले मीन ॥ क्षुधा लागली अति दारुण ॥ भक्षालागली अति दारूण ॥
भक्षावयालागीं घेतले ॥३०॥
राजा म्हणें दमयंती ॥ हे मच्छ धुवोनि निश्चित ॥ शिजवी भक्षावयाप्रती ॥ आपणासी आतां हे ॥३१॥
ऐसें राजा बोलून ॥ दमयंतीस मच्छ दिले जाण ॥ म्हणे मी ग्रामांतून ॥ येतो परतोन लवलाहें ॥३२॥
राजा गेला नगरांत ॥ तो कोठें समाराधना होत॥ ब्राह्मण जेविती असंख्यात ॥ गणना नसे तयासी ॥३३॥
तेथें जाऊन राजेश्वर ॥ कौतुक पाहे समोर ॥ तों तेही बोलाविले सत्वर ॥ भोजनालागीं तेवेळीं ॥३४॥
राजा करी तेथें भोजन ॥ पात्र जरी द्याल वाढुन ॥ तरी मी जाईन घेऊन ॥ स्त्री माझी बाहेर असे ॥३५॥
त्यांही तैसेंच केलें ॥ पात्र तयासी वाढुन दिधलें ॥ राजा घेऊन आला तेवेळे ॥ मार्गी येतां वर्तलें कौतुक ॥३६॥
तों कली पक्षीयाचें रुप घेऊन ॥ झडप मारी वरुन ॥ गगनपंथें येवोन ॥ पात्र हातीचें नेतसे ॥३७॥
राजा सद्गद झाला चित्तीं ॥ म्हणे धन्य प्राक्तनाची गति ॥ अन्न मिळालें बहु संकटीं ॥ तेंही नेलें पक्षीयानें ॥३८॥
इकडे काय वर्तलें जाण ॥ दमयंतीने मच्छ नेऊन ॥ नदींत बैसली धूत आपण ॥ तों मच्छ जिवंत जाहला ॥३९॥
तिच्या बोटीं अमृत होतें ॥ म्हणोनी मच्छ सजीव त्वरीत ते ॥ पुन्हा जळ प्रवेश करती ते ॥ एकही न राहे तियेजवळी ॥४०॥
तव तो राजा नळ आला ॥ राणीनेम वृत्तांत सांगितला ॥ क्षुधानळ बहुत पेटला ॥ कांही न सुचे तयासी ॥४१॥
तेव्हां दमयंती दीन वदन ॥ राजयाप्राती बोले वचन ॥ मच्छ गेले जवळीचे जाण ॥ जीव आला तयालागीं ॥४२॥
राजा बोले क्रोधें वचन ॥ तूंच भक्षिलें मच्छा लागून ॥ सांगतेस मजला असत्य वचन ॥ नव्हे तुझें सत्य सर्वथा ॥४३॥
राजा उठोनी तेसमयीं ॥ गेला स्नानास लवलाहीं ॥ वस्त्र बाहेर ठेविलें पाही ॥ स्नानासी नळ प्रवेशला ॥४४॥
तो कली पक्षी झाला पूर्ण ॥ वस्त्र घेऊन गेला जाण ॥ राजा जळीं होता नग्न ॥ दमयंतीस पाचारी ॥४५॥
दमयंतीनें आपुलें वस्त्र ॥ अर्ध फाडोन दिधलें साचार ॥ तेंच नेसला राजेश्वर ॥ स्नानकरुनी ते काळीं ॥४६॥
दमयंती म्हणी राजया लागून ॥ तुम्हीं गांवांतून आले जेऊन ॥ दोघांचे मनामाजी जाण ॥ संशय दारुण पडियेला ॥४७॥
दोघे उपोषीत असती ॥ गेले कुंभाराच्या गृहाप्रती ॥ निद्रा केली निश्चिती ॥ क्षुधेनें बहुत व्याकुळ होती ॥
तैसेच निजती दोघेजण ॥४८॥
रात्री रायाच्या मनी जाण ॥ दुर्बुध्दी उपजली दारूण ॥ दमयंतीस जावें टाकून ॥ उठला राजा ते समयीं ॥४९॥
दमयंती होती निद्रीस्त ॥ राजा उठोन गेला त्वरित ॥ जागी होऊन जो पहात ॥ भ्रतार जवळी न दिसे ॥५०॥
ऐसें दमयंतीनें पाहून ॥ शोक आरंभिला ते क्षणीं ॥ मूच्छित पडे धर्णी ॥ नळराजा कारणें ॥५१॥
मजवीण तुज एक क्षण ॥ न गमे रायास सत्य जाण ॥ आतां निष्ठूर केले मन ॥ म्हणोनि रुदन करीतसे ॥५२॥
ललाट पिटी मेदिनी ॥ आंग टाकिलें धरणी ॥ म्हणी आतां कोणत्या वनी ॥ पाहूं तुज राजेश्वरा ॥५३॥
काय माझा पहिला अन्याय ॥ कां निष्ठुर झाले ह्र्दय ॥ मी आतां करुं काय ॥ जाउं कोठें राजेश्वरा ॥५४॥
शोक करतां दारूण ॥ नेत्री वाहे अपार जीवन ॥ निचेष्ठित पडली एक दिन ॥ राजा मनीं आठवीत ॥५५॥
मग ते विवेक करुनी ॥ उठती झाली ते क्षणी ॥ हळुहळु पंथ क्रमोनी ॥ येती झाली पितयाचे नगरी ॥५६॥
येऊन बैसली बाहेर ॥ पितयास कळला समाचार ॥ म्हणती दमयंती कन्या सुंदर ॥ बाहेर येऊन बैसलीसे ॥५७॥
राजा न्यावयासी तिज आला ॥ मंदिरी आपुल्या घेऊन गेला ॥ स्फुंदस्फुंदोनि रडे ते वेळां ॥ पतिचे स्मरण करुनी ॥५८॥
राजा समजावी दमयंतीतें ॥ शोक न करी म्हणे माते ॥ वर्तमान निवेदन करी वर्तलें तें ॥ मग दमयंतीनें सर्व
सांगितलें ॥५९॥
राजा जोऊन सद्गदीत ॥ ह्रदयीं तीस आलंगित ॥ म्हणे कन्ये शोक सत्य ॥ न करी तू आतां येथूनी ॥६०॥
जेथें असेल राजा नळ ॥ तेथून शोधून आणिन तात्काळ ॥ नको करुं तूं तळमळ ॥ निश्चित राहे सर्वथा ॥६१॥
रायें बोलावून ब्राह्मण ॥ तयासी पुसे व्रत अनुष्ठान ॥ कोणतें करावें जेणें नळ आपण ॥ चालोन येईल येथें पै॥६२॥
विप्र म्हणती राया ऐक ॥ कोकिळाव्रत पुण्यदाय्क ॥ दमयंती करील देख ॥ तरी नळ येईल येथेंची ॥६३॥
मग कोकिळाव्रत उत्तम ॥ करी दमयंती सप्रेम ॥ व्रताचा विधियुक्त करी नेम ॥ धरीला तेणें निजनिष्ठें ॥६४॥
तेणें नळास प्राप्त झाली चिंता ॥ की श्वशुरगृहीं जावें आतां ॥ मग नळराजा अवचिता ॥ येता झाला श्वशुरगृहीं
॥६५॥
तेणें सकळांसी झाला आनंद ॥ ब्राह्मणालागीं दान देत ॥ ते समयीं शर्करा वाटित ॥ नगरामाजी ते काळी ॥६६॥
कोकिळाव्रताचें पुण्य प्रबळ ॥ दमयंतीस भेटला नळ ॥ तेणी आनंदाचा कल्लोळ ॥ अंतरी उल्हास न मावें ॥६७॥
जे करिती कोकिळाव्रत ॥ त्यासी भय नाहीं जन्मावरी निश्चित ॥ रोग दु:ख दरिद्र समूळ सत्य ॥ पळोन जाती सर्वस्वें
॥६८॥
इति श्रीस्कंदपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्ये ॥ पंचदशोऽध्याय: ॥६८॥ ॥ अध्याय ॥१५॥ ओंवी ॥६८॥
॥ श्रीरस्तु ॥
॥ अध्याय १५ वा समाप्त: ॥

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती