तुळशीचें रोप लावणें, त्याचें रक्षण करणें, त्याला पाणी घालणें, तिचें दर्शन घेणें व तिला स्पर्श करणें यांपासून वाणी, मन व शरीर यांजकडून घडलेलीं सर्व पापें तुळशी नाहींशी करते ॥१२॥
तुलसीमंजिरींने जो विष्णु व शंकर यांची पूजा करितो तो कधींही पुन्हा जन्मास न येतां मोक्षास जातो; यांत संशय नाहीं ॥१३॥
पुष्कर आदिकरुन सर्व तीर्थे, गंगादिक सर्व नद्या व वासुदेवादिक सर्व देव हे तुलसीवनामध्यें राहतात ॥१४॥
तुळशीची मंजिरी घेऊन जर कोणी प्राण सोडील तर तो शेंकडो पापांनीं युक्त असला तरी यम त्याजकडे पाहाण्यास देखील समर्थ होत नाहीं ॥१५॥
तो विष्णूच्या जवळ सायुज्यतेला जाईल. राजा ! हें अगदीं खरें आहे. जो तुलसीकाष्ठाचें चंदन धारण करितो ॥१६॥
त्यानें पाप केलें तरी त्याच्या देहाला शिवणार नाहीं तुळशीच्या झाडांची सावली जेथें जेथें असेल ॥१७॥
तेथें श्राद्ध करावें; म्हणजे पितरांना दिलेलें अक्षय्य होतें, आवळीच्या झाडाखालीं जो पिंडदान करील ॥१८॥
त्याचे जे पितर नरकांत असतील ते मुक्तीला जातील. राजा ! जो मस्तकावर हातांत, मुखांत व शरीरावर ॥१९॥
आवळे धारण करील, तो विष्णूसारखा जाणावा ॥२०॥
आवळा, तुळशी व द्वारकेंतील माती गोपीचंदन हीं ज्याच्या देहावर आहेत, तो नेहमीं जीवन्मुक्त समजावा ॥२१॥
आवळे व तुळशीपत्र यांनीं मिश्रित पाण्यानें जो स्नान करील, त्याला गंगास्नानाचे फळ सांगितलें आहे. जो मनुष्य आवळीचीं पानें व फळें यांनीं देवाची पूजा करील ॥२२॥
त्याला सोनें, रत्ने, मोती यांनी पूजा केल्याचें फळ मिळतें. सर्व तीर्थे, ऋषि, देव, यज्ञ हे सर्व कार्तिकमासी ॥२३॥
तुळा राशीस सूर्य असतां आवळीमध्यें सर्वकाळ असतात ॥२४॥
कार्तिक महिन्यांत द्वादशीला तुळशीचें किंवा आवळीचें पान जो तोडील तो निंद्य अशा नरकास जाईल ॥२५॥
कार्तिक महिन्यांत जो आवळीचे छायेखालीं भोजन करील, त्याचें एक वर्षपर्यंतचें अन्नसंसर्गाचें पातक जाईल ॥२६॥
जो कार्तिकमासी आवळीचे मुळापाशी विष्णूची पूजा करील त्याला सर्व क्षेत्रांत विष्णूची पूजा केल्याचें पुण्य मिळेल. जसें विष्णूचें माहात्म्य वर्णन करण्यास ब्रह्मदेव समर्थ नाहीं, तसें आवळी व तुळशीं यांचें माहात्म्यही वर्णन करण्यास तो समर्थ नाहीं ॥२७॥
जो मनुष्य आवळी व तुळशी यांच्या उत्पत्तीचें कारण ऐकेल व दुसर्याला ऐकवील, त्याचीं सर्व पापें नाहींशीं होऊन उत्तम विमानांत पूर्वजांसह बसून स्वर्गास जातो ॥२८॥