Kanda Navmi 2025 कांदे नवमी का साजरी करतात? आज कांद भजी बनवून खाण्याची मजा

शुक्रवार, 4 जुलै 2025 (17:30 IST)
आषाढ शुद्ध नवमी ही आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील नववी तिथी आहे. हिला कांदे नवमी किंवा भडली नवमी म्हणतात. यादिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे. कारण या दिवसानंतर दोनच दिवसांनी आषाढी एकादशी येते आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते.
 
आषाढी शुध्द एकादशीपासून ते कार्तिकी शुध्द एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने, कांदा लसुण खाणं बंद करायचं. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घेयचं म्हणून मोठी एकादशीपूर्वी अर्थात आषाढ शुद्ध नवमीला कांदे नवमी म्हणून साजरी करायची. खरं म्हणजे पावसाळ्यात कांदा सडल्या सारखा होतो, म्हणून चातुर्मासात वर्ज केलेला आहे तसेच वांगीदेखील वर्ज आहे.
 
भडली नवमीच्या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात धडाक्यात लग्ने होतात. या मुहूर्तासाठी पंचांग पहावे लागत नाही. भडली नवमीनंतर दोनच दिवसांनी चातुर्मास सुरू होतो आणि तो संपेपर्यंत लग्नाचे मुहूर्त नसतात.
 
आता या दिवशी काय करावे हा प्रश्न असेल तर भले ही कांदे वांगी चातुर्मासात चालू द्या पण यादिवशी कांदा भजी, कांद्याचे थालीपीठ, भरलेली वांगी हे पदार्थ तयार करून हा दिवस साजरा केला जाऊ शकतो.
 
हल्लीची पीढी हे सगळं अजिबात मानत नाही तरी एकेकाळी हे नियम प्रमाणिकपणे लागू व्हायचे. कोणच्याही घरातून कांदा, लसणाचा फोडणीचा घमघमीत वास येणे शक्यचं नव्हते. म्हणून यादिवशी भरपूर कांदे खाल्ले जायचे. मग विचार काय करायचा नियम पाळत नसला तरी होऊन जाऊ द्या कांद्याची भजी, थालीपीठे, झुणका वगैरे. आणि नियम पाळायचा असेल तर संपवा कांद्याचा स्टॉक.

कांदा भजी रेसिपी
पावसाळा सुरु झाला आहे. या दिवसांत कुरकुरीत भजी खावेसे वाटते. बनवा पावसाळा स्पेशल कुरकुरीत कांदा भजी साहित्य आणि कृती जाणून घ्या.

साहित्य
2 कांदे (उभे चिरून)
2 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून
1 कप बेसन पीठ
1 चमचा रवा 
1/2 टी स्पून जिरे
1/2 टी स्पून ओवा
1/2 टी स्पून लाल तिखट
2 टी स्पून गरम तेल
 कोथिंबीर बारीक चिरलेली 
तळण्यासाठी तेल
चवीनुसार मीठ

कृती
कांदा भजी बनवण्यासाठी एका भांड्यात सर्व साहित्य मिसळून घ्या. त्यात 2 मोठे चमचे पाणी घालून घोळ तयार करा. एका नॉन स्टिक कढईत तेल गरम करा. गरम तेलाचं मोहन मिश्रणात टाकून चांगले मिक्स करुन घ्या. आता कांदे मिश्रणात टाका. कांद्यासकट मिश्रण उचलून तेलात सोडा. सोनेरी होयपर्यंत तळून घ्या. नंतर टिशू पेपरवर काढा. गरमागरम कांदा भजी खाण्यासाठी तयार. हिरव्या चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती