कानफाडया मारुती किंवा चपेटदान मारुती मारुती म्हणजेच नेमके स्वरुप काय?
मंगळवार, 30 सप्टेंबर 2025 (16:22 IST)
चपेटदान मारुती म्हणजे अशी हनुमानाची मूर्ती ज्यामध्ये मारुतीचा उजवा हात चापट मारण्याच्या आवेशात उगारलेला असतो, ज्यामुळे याला कानफाड्या मारुती असेही म्हणतात. ही मुद्रा संकटांना किंवा नकारात्मक शक्तींना पळवून लावण्यासाठी आहे, जिथे मारुतीच्या पायाखाली अनेकदा एखादा राक्षस किंवा राक्षस स्त्री दाखवली जाते.
चपेटदान मारुतीची वैशिष्ट्ये:
या मूर्तीत मारुतीचा उजवा हात कानशिलाजवळ चापट मारण्याच्या स्थितीत उगारलेला असतो.
अनेकदा या मारुतीच्या पायाखाली एखादा राक्षस किंवा राक्षस स्त्री दाखवली जाते, जी मारुतीद्वारे पराभूत झालेली असते.
ही मुद्रा नकारात्मक शक्तींना, संकटांना किंवा वाईट शक्तींना चापटीने पळवून लावण्याचा अर्थ दर्शवते.
एका आख्यायिकेनुसार, पायाखालील स्त्री शनीच्या साडेसातीचे प्रतीक आहे आणि अशा मारुतीची उपासना केल्यास साडेसातीचा त्रास कमी होतो अशीही एक श्रद्धा आहे.
मुळात मारुतीच्या मूर्तीचे अनेक प्रकार बघायला मिळतात. कधी रामासमोर गुडघ्यावर नमन करीत बसलेला मारुती तर कुठे रामासमोर नमस्कार मुद्रित उभा असलेला मारुती. कधी राम-लक्ष्मण या भावडांना खांद्यावरून घेऊन जाणारा तर कुठे लक्ष्मणाला जीवनदान देणारी संजीवनी यासाठी द्रोणागिरी पर्वतच उचलून आणून देणारा मारुती. तर कुठे हृदयातील प्रभू रामचंद्राचे स्थान दाखवत छाती फाडणारा तर कधी गदा उगारून राक्षसांच्या सेनेचा संहार करणारा मारूती. तर कुठे-कुठे निद्रिस्त अवस्थेतील अशी या मारुतीची विविध प्रकारची मूर्ती पहायला मिळते.
'चपेटदान मारुती' हे मारुतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप आहे ज्यात अशोकवनात रामदूत म्हणून सीतामातेला भेटल्यानंतर अशोकवाटिकेचा विध्वंस करणारा हनुमंत असल्याचे कळून येते. प्रभू रामचंद्राच्या आज्ञेप्रमाणे लंकेला भेट देऊन आणि सीतामातेला भेट देणारे मारुती दूत या भूमिकेत होता आणि निशस्त्र होता. तेव्हा अशोकवाटिकेच्या संरक्षणासाठी राक्षस स्त्रियां तेथे होत्या. तेव्हा मारुतीने केवळ शरीर बळावर वन उध्वस्त केले. तेव्हा या स्वरुपात मारुतीचा डावा हात त्याच्या कमरेवर टेकवून ठेवलेला असून त्या हातात उन्मळून काढलेले वृक्ष असते. मारुतीचा उजवा हात चापट मारण्याच्या अविर्भावात उगारलेला असतो. शेपटी उजवीकडून वरील बाजूकडे मस्तकावरून डाव्या बाजूला कमरेपर्यंत कमानी यासारखी दिसून येते. या स्वरुपात मारुतीची उभारलेली शेंडी त्यांच्या क्रोध अवस्थेचे प्रतीक असल्याचे समजते. हातात व दंडावर कडे, गळ्यात अलंकार व पायात तोडे शोभतात. मात्र ब्रह्मचारी मारुतीच्या पायाखाली असलेले स्त्री शिल्प हेच या स्वरुपाचे वेगळेपण आहे.
अशोकवाटीकेच्या राक्षस स्त्रियांनी मारुतीला सशस्त्र प्रतिकार केला तेव्हा या प्रसंगाचे शिल्पांकन म्हणून या रुपाची निमिर्ती झाली. अशोकवाटिकेच्या विध्वंस प्रसंगाचे यथार्थ चित्रण असलेल्या मारुतीच्या अशा मूर्ती दुर्मिळ आहे. तरी कोल्हापूर परिसरात या स्वरुपाच्या मूर्ती पाहायला मिळतात.
कानफाडया मारुतीचा हा आवेश संकटांना चापटीने पळवून लावणारा आहे.