गोरक्षनाथ ११ व्या ते १२ व्या शतका दरम्यान झालेले नाथ योगी होते. गोरक्षनाथांचे मंदीर गोरखपूर उत्तरप्रदेशामध्ये आहे. गोरक्षनाथांचे नावावरून नेपाळमधील गोरखा या नावाचा उगम आहे. गोरख जिल्ह्यात एका गुहेत गोरक्षनाथांचे एका पायाचे पद चिन्ह आहे.
जन्माची आख्यायिका
मच्छिंद्रनाथ हे भारतभर भ्रमण करीत असत. असे फिरत असतांना ते एका घरी भिक्षा मागण्यास गेले. या घराला सगळे काही असले तरी संतती नव्हती. दारी एक तेज:पुंज साधू आलेला पाहून घरातल्या स्त्रीने भिक्षा वाढतांना आपल्याला मूल व्हावे असा आशीर्वाद मागितला. त्यावर मच्छिंद्रनाथांनी त्या स्त्रीला एक चिमूटभर भस्म दिले आणि आशीर्वाद दिला, की मुलगा होईल.
स्त्री हरखून गेली व तिने शेजारी-पाजारी जाऊन सांगितले की, भिक्षा मागायला आलेल्या साधूंनी मला हे भस्म दिले आहे आणि आता मलाही तुमच्या सगळ्यांसारखा मुलगा होणार. हे ऐकून शेजारी पाजारी हसू लागले. त्यामुळे शरमून जाऊन त्या स्त्रीने ते भस्म शेणाच्या ढिगावर टाकून दिले.
बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ परत तेथेच भिक्षा मागण्यास आले. परत तीच स्त्री भिक्षा देण्यास आली. तिला पाहून मच्छिंद्रनाथांनी विचारले की, मुलगा कसा आहे? तर स्त्री म्हणाली की मूल झालेच नाही. मच्छिंद्रनाथ म्हणाले की असे होणेच शक्य नाही. त्यावर तिने घडलेले सर्व कथन केले. मच्छिंद्रनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाजवळ गेले व त्यांनी हाक मारली "चलो गोरख!" त्याबरोबर त्या शेणातून एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले "आदेश!" मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाला घेऊन गेले. हाच मुलगा पुढे गोरक्षनाथ म्हणून प्रसिद्धीस आला.
कानाला भोके पाडण्याची पद्धतीही गोरक्षनाथांनी सुरू केली. अशी भोके पाडण्याआधी साधकांना अतिशय कठोर हटयोगाची साधना करावी लागे. हे साधू अवधूत असत.
नवनाथ संप्रदाय उपदेश
त्रिंबकेश्वर हे नाथ संप्रदायाचे उगम स्थान मानले जाते. याच ठिकाणी गुरु गोरक्षनाथांनी ९ नाथांना व ८४ सिद्धांना उपदेश केला. ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शीळा होय. ॠषींना घेऊन गुरु गोरक्षनाथ कौलगिरीकडे गेले तेथे त्यांना एका शिळेवर सर्व ऋषींना बसवून उपदेश दिला त्यातील ९ शिष्यांनी तो जसाचे तसा ग्रहण केला त्यांना नवनाथ म्हणतात. ते नवनाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, नागनाथ व चरपटीनाथ. त्या शिळेला अनुपम शिळा म्हणतात.
दत्तात्रेय आणि गोरक्षनाथ यांची भेट
आदि गुरू दत्तात्रेय आणि गोरक्षनाथ यांची भेट गिरनार पर्वतावर झाली असल्याचे प्रसिध्द आहे. याच ठिकाणी गोरक्षनाथांवर दत्तात्रेयांनी सिद्धीसामर्थ्य दाखवून अनुग्रह केला. हे स्थान "कमंडलू तीर्थ या नावाने प्रसिद्ध आहे. गोरक्षनाथांनी येथील शिखरावरील दत्तपादुकांचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते. दत्तांनी त्यांना या ठिकाणी उन्मत पिशाचवत् अशा दिगंबर, भस्मचर्चित, जटाजूटधारी अशा स्वरूपात दर्शन दिले.