गुरूदक्षिणा

सूर्य न चुकता प्रकाश देतो, ढग, पाऊस देतो. हवा कोणताही भेदभाव न करता सर्वांना जिवंत ठेवते. फूलही सुगंध देण्याचा धर्म सोडत नाहीत. त्याचप्रमाणे गुरूजनही शिष्यांच्या कल्याणासाठी कार्य करतात. शिष्यांकडून गुरूदक्षिणा घेण्याचा त्यांचा उद्देश नसतो. परंतु शिष्याचे सूर्याप्रमाणे देदिप्यमान होणे हीच गुरूला दिलेली सर्वांत योग्य गुरूदक्षिणा आहे.

प्राचीन काळातील एक कथा आहे. एक गुरू आपल्या आश्रमासाठी खूप चिंताग्रस्त होते. ते वृद्ध होत चालले होते आणि त्यांना उरलेले जीवन हिमालयात घालवायचे होते. पण आश्रम योग्य प्रकारे चालवू शकेल असा उत्तराधिकारी कोण असेल याची चिंता त्यांना पडली होती. आश्रमात दोन शिष्य होते. दोघेही गुरूला प्रिय होते. एके दिवशी गुरूंनी त्यांना बोलावून घेतले. मी तीर्थयात्रेला जात असून तुम्हाला दोन मुठी गहू देतो आहे. मी परत येईल तेव्हा मला दोन मुठी गहू परत द्या.

जो शिष्य मला हे गहू सुरक्षित देईल, मी त्याला या गुरूकुलाचा प्रमुख म्हणून नियुक्त करेन. दोघांनी गुरूंना आज्ञा पाळू असे वचन देऊन निरोप दिला. काही महिन्यांनंतर गुरू परत आले. त्यांनी दोघांपैकी एका शिष्याला बोलविले. हा शिष्य या गव्हाची पुरचुंडी बांधून त्याची पूजा करीत होता. त्याने गव्हाची पुरचंडी गुरूंना दिली. त्यातील गहू पार सडून गेले होते. आता त्यांचा कोणताही उपयोग नव्हता.

नंतर गुरूंनी दुसर्‍या शिष्याला बोलाविले. तो गुरूंना आश्रमामागे घेऊन गेला. तेथे त्याने समोरचे शेत दाखवून गुरूंना सांगितले, हे तरारून आलेले पीक पहाताय ना ते तुम्ही दिलेल्या दोन मुठी गव्हातून उभे राहिले आहे. त्यामुळे आपण मला क्षमा करा. तुम्ही दिलेले गहू मी तुम्हाला परत देऊ शकत नाही. डोलणारे हिरवेगार पीक पाहून गुरू प्रसन्न झाले. ते म्हणाले, जो शिष्य गुरूचे ज्ञान वाटतो तोच उत्तराधिकारी होण्यास पात्र आहे. गुरूसाठी हीच खरी गुरूदक्षिणा आहे.

सामान्यतः गुरूदक्षिणेचा अर्थ बक्षिस वा आर्थिक मोबदला असा घेतला जातो, परंतु तो खऱा अर्थ नाही. गुरूदक्षिणेचा अर्थ खूप व्यापक आहे. गुरूकडून प्राप्त झालेल्या शिक्षणाचा किंवा ज्ञानाचा प्रसार-प्रचार व त्याचा योग्य उपयोग जनकल्याणासाठी करावा हीच खरी गुरूदक्षिणा आहे. गुरूदक्षिणेचा अर्थ शिष्याच्या परिक्षेसंदर्भातही घेतला जातो. गुरूदक्षिणा गुरूप्रती सन्मान व समर्पण या भावनेचे प्रतीक आहे. गुरूला योग्य दक्षिणा म्हणजे तुम्ही स्वत: गुरू बना. खरा गुरू तोच की जो शिष्याला स्वत: चे गुरूत्व बहाल देतो.

गुरूदक्षिणा अशा वेळी दिली जाते किंवा घेतली जाते, ज्यावेळी शिष्य गुरूने दिलेल्या ज्ञानाने ओथंबलेला असतो. अर्थात, शिष्यच गुरू होण्याच्या स्थितीत आलेला असतो. गुरूजवळचे समग्र ज्ञान जेव्हा शिष्य ग्रहण करून घेतो आणि गुरूजवळ देण्यासाठी काहीही उरलेले नसते तेव्हा गुरूदक्षिणेचे सार्थक होते.

अर्जुनाने यूद्धभूमीवर गुरू द्रोणाचार्याला समोर प्रतिस्पर्धी योद्ध्याच्या रूपात पाहिले तेव्हा त्याने लढण्यास नकार दिला. असे करण्यात अर्जुनाचा गुरूप्रती आदर दिसतो. एकलव्याला गुरू द्रोणाचार्यांनी विचारले, की तुझा गुरू कोण आहे? तेव्हा त्याने सांगितले, की गुरूदेव आपणच माझे गुरू आहात. आपल्या कृपेने आपल्या मूर्तीला गुरू मानून मी धनुर्विद्या शिकलो आहे. तेव्हा द्रोणाचार्यांनी एकलव्याला गुरूदक्षिणा म्हणून त्याचा अंगठा मागितला. एकलव्याने हसत आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्यांना दिला. यामुळे एकलव्याची ख्याती दूर पसरली आणि तो एक इतिहास पुरूष बनला.

गुरूचे संपूर्ण जीवन आपल्या शिष्याला सर्व बाबतीत लायक बनविण्यात जाते. गुरू आपले कर्तव्य पूर्ण करतो पण दुसरे कर्तव्य शिष्याचे आहे, ते म्हणजे गुरूदक्षिणा देणे. हिंदू धर्मात गुरूदक्षिणेचे महत्त्व अधिक मानले जाते. गुरूकुलामध्ये शिक्षण घेतल्यानंतर शिष्य घरी जाताना गुरूदक्षिणा देतो. गुरूदक्षिणेचा अर्थ काही धन-दौलत नाही. ते गुरूवर अवलंबून असते की तो आपल्या शिष्याला कोणत्या प्रकारची गुरूदक्षिणा मागतो.

गुरू आपल्या शिष्याची परीक्षा घेताना अनेकदा गुरूदक्षिणा मागतात. त्यावेळी गुरूच्या आदेशाचे पालन करणे शिष्याच्या जीवनाचे परम कर्तव्य बनते. विवेकानंदांनी गुरूंचा आदेश मानून संपूर्ण जगात सनातन धर्माचा प्रचार-प्रसार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गुरूंच्या आदेशानुसार हिंदवी स्वराज्याची उभारणी केली.

कृष्ण आणि बलराम यांनी सांदिपनींच्या आश्रमात राहून शिक्षण पूर्ण केले. गुरूदक्षिणा देण्याची वेळ आली तेव्हा गुरूने मगरीने गिळलेल्या आपल्या पुत्राला परत मिळवून द्यावे अशी गुरूदक्षिणा कृष्णाकडे मागितली. गुरूदक्षिणा देण्यासाठी कृष्ण-बलरामाने यमराजाकडे जाऊन त्यांचा पुत्र परत आणून दिला.

अंगुलीमालसारखा क्रूर दरोडेखोर बुद्धामुळेच भिक्षू बनला. असे गुरूचे सामर्थ्य असते. गुरूच योग्य शिष्याला शोधून काढतात. चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला, समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजीला आणि रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना शोधले. आपण योग्य शिष्य असाल तर आपल्याला गुरू शोधण्याची गरज नाही. गुरू स्वतःच तुमचा शोध घेईल. फक्त तुम्ही गुरूदक्षिणा देण्यासाठी तयार रहा.

वेबदुनिया वर वाचा