कोकीळ मादी कामचुकार मानली जाते. आपण घातलेली अंडी ती कावळ्याच्या घरट्यात ठेवून त्याला मुर्ख बनविणारी अशी तिची प्रतिमा आहे. तिची ही प्रवृत्ती महाकवी कालिदासानेही 'विहगेषू पंडीत' असे म्हणून अधोरेखित केली आहे. यजुर्वेदात तर चक्क हा अन्याय आहे, असे म्हटले आहे. कावळे दाम्पत्य या कोकीळेच्या पोरांनाही आपलेच समजून सांभाळतात. ही पोरंही भलतीच कृतघ्न असतात. आपण उडू शकतो, हे लक्षात आल्यानंतर कावळे दाम्पत्याला चकवून निघून जातात. एवढेच नाही तर कावळ्याचे एखादे अपत्य घरट्यात असेल तर कोकीळेची पोरं त्यालाही घरट्याबाहेर फेकून देतात.