देशभरात मतदानास उत्साहात सुरूवात

गुरूवार, 17 एप्रिल 2014 (11:24 IST)
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात गुरूवारी सकाळी देशभरातील १२ राज्यांत मतदानास सुरूवात झाली आहे. देशभरात बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक,महाराष्ट्र, मध्यप्रदेश, मणिपूर, ओडिसा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांनी उत्साहाने रांगेत उभ राहून मतदानाचा हक्क बजावायला सुरूवात केली आहे. 
 
कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या दरम्यान खरी चुरस असलेल्या या निवडणुकीत आम आदमी पक्षासह अनेक प्रादेशिक पक्ष सत्तेचे सोपान चढून जाण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. पाचव्या टप्प्यातील 121 मतदारसंघांपैकी सर्वाधिक 40 मतदारसंघांत भाजपचे, तर 36 मतदारसंघांत कॉंग्रेसचे विद्यमान खासदार आहेत. या टप्प्यात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली, ज्योतिरादित्य शिंदे, नंदन नीलेकणी, केंद्रीय मंत्री श्रीकांत जेना, माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा, मनेका गांधी, चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, ऑलिंपिक विजेते नेमबाज राजवर्धन राठोड, कर्नाटकातील वादग्रस्त नेते बी. एस. येडियुरप्पा, माजी फुटबॉल कर्णधार बायचुंग भुतिया तसेच लालूप्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारती यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. 

वेबदुनिया वर वाचा