पंतप्रधान मोदीच; राजनाथ सिंहांची स्पष्टोक्ती

सोमवार, 21 एप्रिल 2014 (11:22 IST)
16 व्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) यश मिळाले सत्ताधारी सरकारचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी हेच असतील, अशी स्पष्टोक्ती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी रविवारी केली.

सिंह यांनी विमानात दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत एनडीए सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असतील. एनडीएला बहुमत मिळविण्यामध्ये वेळप्रसंगी राजकीय पक्षांशी हातमिळवणी करावी लागू शकते. मात्र असे झाले तरी नरेंद्र मोदीच देशाची पंतप्रधान होतील, असे सिंह यांनी स्पष्ट केले आहे. देशाचा राज्यकारभार हा केवळ नियमांनी नव्हे; तर नैतिक अधिकार असलेल्या नेत्याद्वारे होत असतो. पंतप्रधानपदाचा वा मुख्यमंत्री पदाचा
उमेदवार म्हणून घोषित करण्यात उमेदवाराकडेच अशा प्रकारचा नैतिक अधिकार असेल, असेही सिंह म्हणाले.

कोणत्याही जातीस, धर्मास मतांसाठी विशिष्ट प्रकारचे आवाहन करण्यात येऊ नये. समाजामधील सर्व घटकांना भेदभाव न करता सारख्याच प्रकारचे आवाहन करावयास हवे, असे सिंह यांनी सांगितले. मतांसाठी कोणत्याही विशिष्ट जाती समुदायास संबोधित न करण्याच्या मोदी यांच्या निर्णयाचेही सिंह यांनी यावेळी समर्थन केले. 

वेबदुनिया वर वाचा