नरेंद्र मोदींचा वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल

शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (11:29 IST)
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी (24 एप्रिल) वाराणसी मतदारसंघातून लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोदींनी जबरदस्त शक्तीप्रदर्शन केले. यावेळी सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश आणि शिक्षणसुधारक मदन मोहन मालवीय यांचे नातू गिरीधर मालवीय यांनी मोदींच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी केली.

अर्ज दाखल करण्‍यापूर्वी पावणेदोन तास मोदींची 'नमो' गजरात भव्य रोड शो झाला. आलोट गर्दीच्या साक्षीने मोदी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी गुजरातमधील बडोदा मतदारसंघातूनसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळीसुद्धा एका चहाविक्रेत्याने सूचक म्हणून मोदींच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती.

वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतानासुद्धा सूचक म्हणून प्रख्यात शहनाईवादक बिस्मिल्ला खॉं यांच्या कुटुंबीयांना विचारणा करण्यात आली होती. मात्र, बिस्मिल्ला खॉं यांचे चिरंजीव झमिन हुसेन यांनी ऐनवेळी मोदी यांचे सूचक म्हणून स्वाक्षरी करण्यास स्पष्टपणे नकार दिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नरेंद्र मोदी वाराणसीत आले तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. 

वेबदुनिया वर वाचा