'दिल्लीत मनमोहनांची सत्ता नाहीतर आई-मुलाची सत्ता'

सोमवार, 21 एप्रिल 2014 (11:26 IST)
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मनमोहन सिंह यांची सत्ता नसून आई-मुलाची सत्ता असल्याची टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर अमेठी न सांभाळू शकणारे देश कसे काय सांभाळतील? असा खोचक टोलाही कॉंग्रेसचे उमेदवार राहुल गांधी यांना लगावला आहे. छत्तीसगडमधील सरगूजा येथे रविवारी मोदींची सभा झाली. यावेळी ते काँग्रेसवर जोरदार हल्ला केला.

मोदी म्हणाले, कॉंग्रेसचे सरकार गेल्याशिवाय देशाचे भले होणार नाही. 'माझ्या मुलाला सांभाळून घ्या,' असे शनिवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अमेठीतील मतदारांना भावनिक आवाहन केले होते. त्यावर, जी व्यक्ती अमेठी सांभाळू शकत नाही ती देश काय सांभाळेल, असा टोला मोदींनी यावेळी लगावला.

बारुंच्या वादग्रस्त पुस्तकावरुनही मोदींनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली. देशाच्या अधोगतीसाठी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना दोषी ठरवले जात होते. पण एका पुस्तकामुळे मनमोहन दोषी नसून आई-मुलाची जोडी यासाठी जबाबदार आहे, हे स्पष्ट झाल्याचे मोदींनी सांगितले. तसेच देशात महिलांवर अत्याचाराच्या सर्वाधिक घटना काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये घडतात असाही आरोपही त्यांनी केला आहे. 

वेबदुनिया वर वाचा