गणेश चतुर्थी 2022 शुभ मुहूर्त आणि पंचोपचार पूजा विधी
बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (07:02 IST)
यंदा गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट 2022 बुधवारी आहे. या दिवशी गणेश मूर्ति स्थापना शुभ मुहूर्त-
सकाळी : 6 वाजून 9 मिनिटांपासून
दुपारी : 11 वाजून 12.15 मिनिटांपर्यंत
संध्याकाळी : 5 वाजेपासून ते 6.30 मिनिटांपर्यंत
शुभ-लाभ चौघडिया मुहूर्त : रात्री 8 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत
इतर मुहूर्त :
विजय मुहूर्त : दुपारी 02:05 ते 02:55 पर्यंत
गोरज मुहूर्त : संध्याकाळी 06:06 ते 06:30 पर्यंत
अमृत काळ मुहूर्त : संध्याकाळी 05:42 ते 07:20 पर्यंत
रवि योग : सकाळी 05:38 ते रात्री 12:12 पर्यंत या दिवशी शुक्ल योग देखील असेल.
संध्याकाळ पूजा मुहूर्त : संध्याकाळी 05:42 ते 07:20 पर्यंत
देवपूजेसाठी काही नियम-
पुजेला बसताना कायम धूतवस्त्र सोवळे इ. नेसून बसावे.
पुजा आसानावर बसूनच करावी. जमिनीवर बसू नये. तसेच आपले आसन देवतांच्या आसनापेक्षा उंच असू नये.
कपाळाला गंध असावे.
देवपूजा करताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे, मध्येच उठू नये.
देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटा ठेवावी.
आपल्या डाव्या बाजूला समई व उजव्या हाताला तुपाचे निरांजन ठेवावे.
फुले वाहताना कायम देठाकडची बाजू देवाकडे करावी.
विड्याची पाने कायम उताणी व देठ देवाकडे असावे.
नारळाची शेंडीसुद्धा देवाकडे असावी.
पंचोपचार पूजा
पंचोपचारपूजा म्हणजे पाच उपचारांनी जी पूजा करतात, त्याला पंचोपचारपूजा म्हणतात.
गंध - देवाला गंध लावावे.
पुष्प - देवाला फुले अर्पण करावी.
धूप - देवाला धूप / उदबत्ती ओवाळावी.
दीप - देवाला तुपाचे निरांजन ओवाळावे.
नैवेद्य - देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्य ठेउन देवाला नैवेद्य दाखवावा.
गणेश - जास्वंद, चाफा, शमी, मोगरा, केवडा इ. सुवासिक फुले देवाला प्रिय आहे. यासोबतच दूर्वा अत्यंत प्रिय आहे. फळांमध्ये डाळींब, सफरचंद, सिताफळ श्रीफळ इ. गणेशाला प्रिय आहेत.
प्रथम आपल्या इष्ट देवतांना हळदकुंकू वाहून देवापुढे विडयाची दोन पाने, त्यावर एक रुपया व एक सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा. गुरुजींना नमस्कार करुन घरातील वडील मंडळींना नमस्कार करावा. आसनावर पूजेसाठी बसावे व पूजेला आरंभ करावा.
पुढे दिलेल्या चोवीस नावांपैकी पहिल्या तीन नावांचा उच्चार करुन प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन आचमन करावे. चौथ्या नावाचा उच्चार करुन संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन उदक सोडावे. याप्रमाणे दोन वेळा करावे .
गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रात:स्नानसंध्या पूजादी नित्यविधी करावेत. मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ सारवून त्यावर रंगीत चौरंग मांडून किंवा चौरंगावर लाल कपडा पसरवून अक्षता पसराव्यात. नंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शूचिर्भूतपणे आसनावर बसवून द्विराचमन, प्राणायामादी केल्यावर श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये असा संकल्प म्हणून पाणी सोडावं. कलश, शंख, घंटा व दीप यांना गंध अक्षता-पुष्प अर्पण करावं. नंतर गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा व मूतीर्च्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे पुढील मंत्र म्हणावेत.