पुण्यात पाच मानाच्या गणपतींची विधिवत प्रतिष्ठापना

शनिवार, 30 ऑगस्ट 2014 (11:14 IST)
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात पाच मानाच्या गणपतींसह अन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत श्रीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. गणयायाच्या आगमनाने सर्वत्र मंगलमय वातावरणात निर्माण झाले आहे. गणरायाच्या स्वागतासाठी वरुण राजानेही हजेरी लावली.

पुण्यातील पाच मानाच्या गणपती मंडळांकडून मंगलमूर्तींची मोठ्या दिमाखात मिरवणूक काढत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पहिला मानाचा गणपती असलेल्या कसबा गणपती मंडळाची प्राणप्रतिष्ठा 11 वाजून 16 मिनिटांच्या मुहूर्तांवर करण्यात आली. मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली. मानाचा तिसरा गणपती असलेल्या श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा सकाळी साडे आकरा वाजता उद्योजक मनोज व प्रीती छाजेड यांच्या हस्ते पार पडली. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा दुपारी 12 वाजता कर्नल संभाजी पाटील यांच्या हस्ते झाली. मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाडा गणेशाची सकाळी साडेदहा वाजता रोहित टिळक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेशाची प्रतिष्ठापना सकाळी साडेदहा वाजता करण्यात आली. विष्णूमहाराज पारनेरकर यांनी श्रीचे विधिवत पूजन करून प्रतिष्ठापना केली. पुण्यातील आणखी एक मोठे मंडळ असलेल्या अखिल मंडई मंडळाच्या गणेशाची प्रतिष्ठापना साडेबारा वाजता प्रसिद्ध वकील हर्षद निंबाळकर यांच्या हस्ते झाली. तसेच जिलब्या मारूती मंडळाच्या गणेशाची प्रतिष्ठापणा अरविंद खाडिलकर यांच्या हस्ते झाली.

वेबदुनिया वर वाचा