आपल्या धर्मात एक असे ही व्रत आहे जे भक्तिभावाने व निष्ठेने केल्यास गुणी, सुरेख पती लाभतो. हे व्रत केल्याने अखंड सौभाग्य व संतती लाभते. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका हे व्रत केले जाते. हा सण खास करून कुमारिकांसाठी आहे. तसेच विवाहित स्त्रिया हे व्रत करतात.
या दिवशी मुली व सुवासिनी सुवासिक तेल लावून स्नान करतात. स्नान केल्यानंतर नदीतील वाळू आणून तीन शिवलिंगे करून भक्तिपूर्वक पूजा करतात, अगर शहरांतून सखीसह पार्वतीच्या मातीच्या प्रतिमा व शिवलिंगे मिळतात, ती आणून पूजा करतात. सर्व दिवसभर कडक उपोषण करून पाणीही पिऊ नये अशी रूढी आहे. मात्र ज्यांना सहन होत नाही ते फलाहार करतात पण आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. रात्री जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून बारानंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाटतात. दुसरे दिवशी सकाळी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करतात.