तेव्हाच अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला. त्या राक्षसाच्या डोळ्यांतून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या. त्याने हसून गडगडाट केला आणि तो म्हणाला, "हे यमधर्मा, माझे नाव अनलासूर. तू तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवलेस म्हणून मी तूला खाऊन टाकतो.'' त्याचा तो कानठळ्या बसवणारा आवाज ऐकून यमधर्म घाबरला आणि पळून गेला.
तो राक्षस समोर जे दिसेल ते खाऊन टाकू लागला. सर्व देव घाबरले व सैरावैरा पळू लागले. देवांनी विष्णूकडे धाव घेतली. विष्णूनी देवांना अभय दिले. तोच राक्षस विष्णूपुढे उभा राहिल्यावर विष्णूदेखील घाबरले आणि त्यांनी गणपतीचे स्मरण केले. गणपती बालकाच्या रूपाने विष्णूपुढे प्रकट झाला आणि विचारू लागला, "हे विष्णू, तुम्ही माझे का स्मरण केलेत?" पण विष्णूनी काही सांगायच्या आतच राक्षसाने काही देवांना आपल्या पकडले. पुन्हा सर्व देव आणि ऋषीमुनी सैरावैरा पळू लागले. पण गजानन मात्र जागचा हलला नाही. तेव्हा अनलासूर गजाननाकडे वळला. त्याने गजाननाला गिळण्यासाठी आपल्या पंज्यांनी उचलले आणि तो गणपतीला आपल्या तोंडात टाकू लागला. सर्व देवांनी हाहाकार केला. तोच एक आश्चर्य घडले. अनलासूराच्या हातातील त्या बाल गजाननाने एकदम प्रचंड रूप धारण केले. ते रूप फारच विराट होते. त्याचे डोके आभाळाला भिडले होते. पाय पाताळात रुतले होते. एका क्षणात त्याने अनलासूराला सोंडेत पकडले आणि त्याला गिळून टाकले.
पण प्रत्यक्ष आगीचा लोळ असलेला तो राक्षस गिळल्यामुळे गणपतीच्या अंगाची आग- आग होऊ लागली. इंद्राने गजाननाच्या डोक्यावर अमृत शिंपडले तरी पण गणपतीच्या अंगाची होणारी आग काही थंड होईना. विष्णूनी आपले कमळ गणपतीस दिले. वरुणाने पावसाची मुसळधार वृष्टी गजाननावर केली. पण गजाननाच्या अंगाची लाहीलाही होत होती. शंकराने आपल्या नागाची सावली त्याच्यावर धरली तरी गणपतीच्या अंगाची लाहीलाही होत होती. तेव्हा अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी गणपतीच्या मस्तकावर ताज्या हिरव्यागार दूर्वा वाहिल्या. त्याबरोबर त्याच्या अंगाची होणारी आग एकदम नाहीशी झाली.