Ganesha Chaturthi 2025 गणपतीची मुर्ती कशी असावी

गुरूवार, 21 ऑगस्ट 2025 (12:54 IST)
पारंपरिकपणे, गणपतीची मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवलेली असावी, कारण ती पर्यावरणस्नेही असते आणि विसर्जनानंतर नदी किंवा जलाशयात सहज विरघळते.
 
गणपती १ फुटांपेक्षा जास्त मोठी मुर्ती नसावी.
 
मुर्ती एका व्यक्तीला सहज उचलुन नेता व आणता आली पाहिजे.
 
मूर्ती सुबक आणि सुंदर असावी. गणपतीची मूर्ती बसलेल्या (आसनस्थ) किंवा उभ्या (स्थायी) स्वरूपात असू शकते.
 
गणपतीच्या मूर्तीला चार हात, मोठे कान, लहान डोळे, लांब सोंड आणि मोठे पोट असावे. उजव्या बाजूला वळलेली सोंड शुभ मानली जाते.
 
मूर्तीवर गणपतीचे पारंपरिक शस्त्र आणि वस्तू दाखवल्या जाव्यात, जसे की मोदक, परशु (कुऱ्हाड), पाश (दोरी), आणि अंकुश (अंकुश).
 
सिंहासनावर किंवा लोडाला टेकुन बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम.
 
रंग नैसर्गिक आणि शांत असावेत. लाल, पिवळा, नारंगी, हिरवा असे चमकदार रंग शुभ मानले जातात. रासायनिक रंग टाळावेत.
 
साप, गरुड, मासा, किंवा युद्ध करतांना किंवा वेगवेगळ्या आकारातील पक्षी, प्राणी वा देवदेवतांच्या स्वरूपात मूर्ती असू नये.
 
शिवपार्वती च्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिव पार्वती ची पुजा लिंगस्वरुपातच केली जाते शास्त्रात मुर्ती निषिद्ध आहे,
 
अथर्वशीर्षमध्ये एका श्लोकात मूर्तीचे वर्णन केले आहे.
एकदंतच चतुरहस्तं पाशमंकुश धारिणम ।
रदं च वरदम हस्तैर बीभ्राणं मुषकध्वजाम । 
रक्तम लम्बोदरं , शूर्पकर्णकम रक्तवाससम । 
रक्तगंधानुलीप्तागं रक्तपुष्पे:सुपुजीतम ।। 
 
गणेशाची मूर्ती ही एकदंत असावी, मूर्तीचे कान मोठे असावे, मूर्तीला चार भुजा असाव्यात, वरच्या दोन हाता पैकी एक हातात पाश आणि दुसऱ्या हातात अंकुश असावा, खालच्या दोन्ही हातातील एक हात हा वरदहस्त किंवा अभय मुद्रेत असावा आणि दुसरा हात हा प्रसाद ग्रहणाचा असावा. मूर्तीच्या डोक्यावर मुकुट किंवा पगडी असणे आवश्यक आहे.
 
मूर्ती लंबोदर असून रक्तवर्णीय असावी. मूर्तीच्या पायापाशी गणपतीचे वाहन मूषक असावे. 
 
गणेश मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये.
 
गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मुर्ती मधे देवत्व येत नाही, तोवर ती केवळ माती समजावी. विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी.
 
मूर्ती स्थापनेसाठी घरातील स्वच्छ, शांत आणि पवित्र जागा निवडावी. 
 
मूर्ती पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ठेवावी.
 
 
मूर्तीखाली लाकडी पाट किंवा स्वच्छ कपडा ठेवावा.
 
मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मुर्ति भंग झाल्यास अजिबात घाबरू नये, त्या मुर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरीत विसर्जन करावे, व दुसरी मुर्ती आणुण प्रतिष्ठापना करावी, मनात कोणतेही भय व शंका आणु नये.
 
कुटुंबात किंवा नात्यात मृत्यु झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पुजा नैवेद्य दाखवून घ्यावा, तसेच त्यांच्याहस्ते मूर्ती विसर्जन करावी.
 
गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये. 
 
गणपतीला दररोज वरण-भात, किंवा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो, केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत. दही-साखर आणि भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे.
 
जितके दिवस गणपती बाप्पा घरी असतील तितके दिवस रोज सकाळ संध्याकाळ आरती करावी.
 
विसर्जन मिरवणूक काढताना टाळ मृदंग अभंग म्हणत बाप्पाला निरोप द्या, अश्लील नृत्य व गाणी वाजवून विकृत चाळे करू नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती