बदलली मुस्लिमांकडे पाहण्याची दृष्टी

वेबदुनिया

शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2009 (17:21 IST)
ND
ND
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्याने जे काही चांगलं घडलं त्यात मुस्लिमांविषयीचा बदललेला दृष्टीकोन महत्त्वाचा ठरावा. मुस्लिमांकडे या आधी ज्या संशयास्पद रितीने पाहिलं जायचं ती संशयग्रस्तता कमी झाली. इतर धर्मियांप्रमाणे मुस्लिम हेही कुठल्याही दहशतवादाचे तितकेच बळी आहेत, हे या हल्ल्याने दाखवून दिलं.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच या हल्ल्यांसाठी मुस्लिमांना दोषी ठरविण्यात आलं नाही. या हल्ल्यातील दहशतवादी मुस्लिम असले आणि ते पाकिस्तानातून आले असल्याचे जरी पुढे आले तरी समस्त मुस्लिम समाजाचे ते प्रतिनिधी नव्हते, हे फार ठळकपणे मांडले गेले. यात माध्यमांची भूमिकाही महत्त्वाची ठरली.

भारतात विविधतेत एकता असली तरीही धार्मिक संघर्षही नित्याचा राहिला आहे हेही नाकारता येणार नाही. हिंदू आणि मुस्लिम अशा या संघर्षाच्या दोन मुख्य बाजू आहेत. याशिवाय हिंदू- ख्रिश्चन आणि हिंदू शीख असाही पैलू आहेत. हिंदू-मुस्लिम संघर्ष मात्र परंपरागत असावा असा जपला जातो आहे.

देशाची फाळणी याच धार्मिक संघर्षाच्या आधारावर झाली. त्यावेळीही लाखो लोक या संघर्षात मृत्यूमुखी पडले. स्वातंत्र्यानंतरच्या दंगलीची उजळणी करायची झाली तरीही नऊ मोठ्या दंगलींमध्ये किमान दहा हजार जण मृत्यूमुखी पडले आहेत.

या सर्व दंगलींमध्ये मुस्लिमांकडे पहाण्याची संशयास्पद नजर तयार होत गेली. भारतातून वेगळ्या झालेल्या पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राचा एक कंगोराही त्याला असल्याने इथल्या मुस्लिमांची सहानुभूती सीमेपलीकडे असल्याचे उगाचच भासविले गेले किंवा तसे चित्र उभे केले गेले.

अमेरिकेत ११ सप्टेंबरला झालेल्या हल्ल्याने तर जणू जगभरातील मुस्लिमांकडे संदिग्ध नजरेने पाहिले जाऊ लागले. भारतातील मुस्लिमांमध्ये तर यामुळे अधिकच भीतीची भावना पसरली. भारतात मुस्लिमांना इतर धर्मियांइतकेच आधार असल्याने आणि त्यांच्याकडे दुय्यम नागरिक म्हणून पाहिले जात नसले तरीही इतरांची त्यांच्या दिशेने टोचणारी नजर होतीच.

त्यातल्या त्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून तर मुस्लिमांकडे अधिक संशयाने पाहिले जाऊ लागले. साखळी बॉम्बस्फोटांनी तर हा संशय अधिक गडद केला. मुंबई, दिल्ली, बेंगलुरू, जयपूर, चेन्नई, कोलकता, हैदराबाद एकामगोमाग एक शहरे या स्फोटांनी हादरली. पण हे स्फोट होऊनही मुंबईत १९९३ मध्ये स्फोटानंतर झालेल्या दंगलीसारखा प्रकार मात्र घडला नाही, हेही इथे नोंदवावे लागेल.

हे स्फोट घडवून आणणार्‍यांचा हेतूही दोन समाजातील सौहार्द तुटावे आणि दंगली घडाव्यात हाच असावा. पण तसे काही घडले नाही. अनेक धार्मिक, राजकीय मुस्लिम संघटनांनी या स्फोटाचा निषेध केला. पण मुस्लिमांविषयीचा संशय काही निवळला नाही. हैदराबाद स्फोटानंतर तर अनेक मुस्लिम तरूणांना पकडण्यात आले. पण त्यातल्या अनेकांना केवळ ते मुस्लिम असल्याने बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

पोलिसांच्या मते दहशतवाद्यांना मदत करणारे अनेक स्थानिक मुस्लिमही आहेत. त्याला स्लीपर सेल म्हटले जाते. त्यासाठी काम करणारी बरीच मंडळी आहेत. पण त्यांना पकडण्याच्या नादात अनेक निरपराध मुस्लिमांवरही अन्याय होत होता. त्यातच दिल्लीमध्ये बाटला हाऊसमध्ये कथित मुस्लिम दहशतवाद्यांच्या चकमकीने वातावरण आणखी गढूळ झाले. मुस्लिमांनी ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला. अनेक हिंदूंच्या मते हा दहशतवाद्यांना शुद्ध करून घेण्याचा प्रयत्न आहे बाकी काही नाही.

याच वातावरणात २६-११ ची घटना घडली. २६ नोव्हेंबरला दहा दहशतवाद्यांनी देशाच्या आर्थिक राजधानीला तब्बल तीन दिवस वेठीला धरले. १६४ नागरिक मृत्युमुखी पडले, तर ३०८ जखमी झाले. या घटनेने मुस्लिमांकडे दहशतवादी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. कारण दहशतवाद्यांनी घातलेल्या रक्तरंजीत थैमानामध्ये मुस्लिम- हिंदू अशी काही वर्गवारी केली नव्हती. जो दिसेल त्याला ठार मारण्याचे सत्र आरंभले होते. त्यामुळेच यात मरण पावलेल्यांमध्ये अनेक मुस्लिमही होते.

देशभरात या हल्ल्याविषयी संतापाची तीव्र लाट उसळली. पण या संतापाने मुस्लिमांना लक्ष्य केले नाही. कुठे दंगलही पेटली नाही. कारण हा हल्ला करणारे पाकिस्तानातून आले होते, हे अजमल अमिर कसाबच्या अटकेने स्पष्ट झाले. शिवाय मुस्लिमांनाही या घटनेचा मोठा धक्का बसल्याचेही दिसले. अनेक मुस्लिम संघटनांनी निषेध केला. मुस्लिमांनी बाहेर पडून एकजूटपणे निषेधाच्या सुरात आपलाही सूर मिसळला.

या हल्ल्यानंतर माध्यमांनी मोठी भूमिका बजावली. या हल्ल्यात मुस्लिमही बळी पडले. त्यांच्या बातम्याही माध्यमांनी दाखविल्या. या हल्ल्यातील मृतांची आकडेवारी पहाता, प्रत्येक नऊ मृतांमागे एक मुस्लिम असल्याचे दिसते. याचा अर्थ मुस्लिमही या हल्ल्याचे तितकेच बळी ठरले आहेत. मुस्लिम आणि दहशतवाद्यांमध्येही फरक असतो हे या घटनेने अधोरेखित झाले. मुस्लिम म्हणजेच दहशतवादी असा राजकीय नेत्यांनी फुगवलेला फुगा या घटनेने फोडून टाकला.

धर्मनिरपेक्ष भारताच्या जडणघडणीत मुस्लिमांचे योगदानही मोठे आहेत. केवळ काही वाट चुकलेल्या लोकांमुळे समस्त समुदायाकडे त्याच नजरेने पाहू नये हे या २६-११ च्या या हल्ल्याने दाखवून दिले.

वेबदुनिया वर वाचा