शीखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांनी १६९९ मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. या पंथाचे स्वरूप लढाऊ होते. कारण त्यावेळचे राजकीय वातावरण. त्यावेळी समाजबांधवांना शिस्तीच्या एका धाग्यात बांधण्यासाठी पाच ककारांची निर्मिती त्यांनी केली. ककार मानणार्यास खालसा पंथाचे मानले जाते.
केस- केस कधीच कापायचे नाही. कारण केस हे पावित्र्याचे व शक्तीचे प्रतीक आहेत. केस हे देवाने दिलेली देणगी आहे. वाढलेल्या केसामुळे हा खालसा पंथाचा सदस्य आहे हे पटकन कळून येते. शीख माणसाने फक्त गुरूपुढेच डोके टेकवायचे, इतरांपुढे नाही. हे एक महत्वाचे कारण आहे. शीख महिलांनी अंगावरचे कोणतेच केस कापायचे नाही, असा दंडक आहे.
कडे- कडे दागिना म्हणून वापरत नसल्यामुळे ते सोन्याचांदीऐवजी स्टीलचे असावे. या कड्यामुळे गुरूशी एकनिष्ठ राहता येते. कोणतेही धर्मविरोधी काम करणार नाही याची सतत आठवण राहण्याचे काम कडे करते. देवाला सुरूवात नाही व शेवटही नाही याचे कडे हे प्रतीक आहे.
कंगवा- वाढलेले केसांची नीट निगा राखता यावी म्हणून जवळ कंगवा असावा. देवाने दिलेल्या शरीराची आपण व्यवस्थित काळजी घेत आहोत याचे कंगवा हे प्रतीक आंहे.
कच्छा- कच्छा म्हणजे एक प्रकारची सूती विजार. ही विजार मात्र गुडग्यापेक्षा खाली नसावी. युध्दाच्या काळात घोडदौडीच्या वेळी हिचा उपयोग होत असे.
कृपाण- अन्यायाचा प्रतिकार करण्याचे व दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी कृपाणचा उपयोग करणे अपेक्षित आहे.