मेरी कोम : चित्रपट परीक्षण

शनिवार, 6 सप्टेंबर 2014 (15:48 IST)
आतापर्यंत प्रियांकाने बर्फी सोडलं तर कस लागेल असं काम अभावानेच केलंय, त्यामुळे तिच्यासाठी ‘मेरी कोम’ साकारणं हा एक वेगळा अनुभव असला तरी त्यामधला तिचा अंदाज अन् त्या सार्‍या गोष्टी प्रोमोमधून दाखवून दिल्या आहेत. ओमंग कुमारची ही ‘मेरी कोम’ साकारताना तिचं वैयक्तिक आयुष्य, त्यामधला एक संघर्ष, प्रवाहाविरुद्ध पोहण्यामध्ये असलेली तिची जिगरबाज वृत्ती, आपलं स्वप्न साकार करण्यासाठी मोजावी लागणारी किंमत या सार्‍या गोष्टींवर प्रकाशझोत टाकणारा असा हा सिनेमा आहे. कारण हा सिनेमा केवळ क्रीडाक्षेत्रातील बॉक्सिंग करिअर इथपर्यंत न राहता मणिपूर अन् तिथल्या नागरिकांच्या जगण्यावर भाष्य करतो. 
 
मणिपूर हे भारताचं अविभाज्य घटक असल्याचं सांगताना अंडरकरंट स्ट्राँग ठेवून त्यामधला फोकस कुठेही शिफ्ट न होऊ देता ओमंग कुमार हे आपल्यापर्यंत तितक्याच सहजपणे पोहोचवतो, हे या सिनेमाचं शक्तिस्थान आहे. मणिपूरच्या दुर्गम खेडय़ातील एक मुलगी भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदकावर नाव कोरुन देशाची मान उंचावते, कारण पुरुषी मक्तेदारी मानल्या गेलेल्या खेळात मेरी कोमने कमावलेलं यश हे तितकंच मोठं अन् महत्त्वाचं आहे. 
 
मुझे ब्राँझ पसंद नही आता..असं तिचे प्रशिक्षक ज्यावेळी ओरडून सांगतात, त्यावेळी उभे राहणारे रोमांच तिथपासून तिचा सुरु होणारा प्रवास या सार्‍या गोष्टी पाहणं हे प्रेरणादायी आहे. वडिलांचा, घरातून असणारा प्रचंड विरोध, मेरी कोम प्रियांकाच्या गर्भार असण्यापासून सुरु झालेला हा प्रवास आपल्यासमोर पुढे जे काही डिलिव्हर करतो, ते पाहणं खूपच रंजक अन् औत्सुक्याचं आहे. तिच्या आयुष्याच्या ऊनपावसात तिची साथसोबत करणारा तिचा नवरा ओन्लेर कोम म्हणजे दर्शन कुमार कर्फ्यू असताना कशाप्रकारे तिची डिलिव्हरी घडवून आणतो. मग आपल्यासमोर येत जाणार्‍या सीन्समधून उलगडत जाणारी मेरी कोम पाहणं हा सारा लाजवाब प्रवास आहे. 

वेबदुनिया वर वाचा