'मर्दानी' राणी: चित्रपट परीक्षण

शनिवार, 23 ऑगस्ट 2014 (15:37 IST)
सध्या स्त्री केंद्रित विषयांचे अनेक सिनेमे हिट होत आहेत. त्याच यादीमध्ये प्रदीप सरकार दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित 'मर्दानी' सिनेमाचे नाव घेता येईल. सिनेमामध्ये राणी मुखर्जी सोडता कोणतेही 'स्टार्स नसतानाही सिनेमातील प्रत्येक कलाकार कामाने ही उणीव भरून काढतो. 
 
एका महिला पोलिस ऑफीसरची ही कहाणी आहे. सिनेमातील सर्वच कलाकारांचे काम उत्तम झाले आहे. महिला पोलिस ऑफिसरची क्राईम केस सोडवण्यामागील जिद्द आणि तिची हुशारी सिनेमात दाखवण्यात आली आहे. सिनेमा पाहताना आपण पुढच्या घटनांबद्दल विविध शक्यता मनाशी वर्तवतो; पण आपले सर्व अंदाज खोटे सरळ आणि साध्या मार्गावरून या सिनेमातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. 
 
शिवानी रॉय अर्थात राणी मुखर्जी ही क्राईम ब्रँचची सीनिअर पोलिस ऑफिसर असते. ती मुंबईतील विविध क्राईम केसवर काम करत असते. दरम्यान, तिने स्टेशनवरून वाचवलेली एक अनाथ मुलगी फ्रेण्ड प्यारी गायब होण्यामागचं कारण शोधण्यासाठी आणि तिला माफीयांच्या जाळ्यातून वाचवण्यासाठी शिवानी ही केस हाती घेते.
 
सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्यासाठी प्यारी (प्रियंका शर्मा)चे अपहरण झालेले असते; पण त्या रॅकेटमधून तिला वाचवण्यासाठी शिवानी विविध शक्कल लढवते आणि वॉल्ट (ताहीर भासिन) या खलनायकावर कशी भारी पडते ही चुरस पाहण्याजोगी आहे. वॉल्ट (ताहीर भासिन) हा सेक्स रॅकेट, ड्र्ग्ज डिलींग आणि ह्युमन ट्रॅफिकींग अशा गुन्ह्यांमागचा मास्टर माईंड असतो. 
 
लहान वयातच त्याने आपले जाळे भारतभर पसरवलेले असते. त्याच्या जाळ्यात अडकलेल्या मुलींना बाहेर काढण्यामधे ऑफिसर शिवानी यशस्वी होते. सिनेमा यशराज बॅनरचा असूनही त्याच त्याच गोष्टींची पुनरावृत्ती टाळण्यात आली आहे आणि तेसुध्दा शेवटी कथेच्या ओघात येऊन जाते.
 
सध्या अँक्शन फिल्म म्हणजे अतिशय अद्भुत प्रयोग करून हिरो किंवा हिरोईनला असामान्यरित्या पेश केलं जातं; पण इथे राणी मुखर्जीने अतिशय सहज आणि वास्तवदर्शी अँक्शेन केल्या आहेत. त्यामुळे सिनेमातील कोणत्याही सीनमध्ये अतिशयोक्ती वाटत नाही; पण अजून एखादा ट्विस्ट हवा होत असे मात्र वाटून जाते.
 
सिनेमातील राणी मुखर्जीचे काम अतिशय उत्तम झाले आहे. तिची या रोलमागची मेहनत दिसून येते. 'अय्या' सिनेमाच्या अपयशानंतर हा सिनेमा राणीला नक्कीच यश मिळवून देईल. वॉल्ट या व्हीलनचा रोल करणार्‍या ताहीर भासीनचे काम उल्लेखनीय आहे. सिनेमाचा यू. एस. पी. म्हणजे राणी मुखर्जीचे डायलॉग्ज आणि 'मर्दानी' पणा आहे. 
 
विशेष उल्लेख करण्याजोगा कोल्हापूरचा दिग्विजय रोहिदास ज्याने क्राईम ब्रँचमधील पोलिस इंस्पेक्टरचा रोल केला आहे. याबरोबरच सिंनेमातील विक्रम रॉय (जिसू सेन गुप्ता), इंस्पेक्टर (माथूर), (विक्रांत कौल), बलविन्दर सिंग सोदी (मिखैल येवलकर), सनी कट्याल (आदित्य शर्मा) आदी कलाकारांचे काम उत्तम आहे. राणीचे हे 'मर्दानी' पण प्रेक्षकांच्या पसंतीला उतरायला हरकत नाही.

वेबदुनिया वर वाचा