फाईंडिंग फॅनी : चित्रपट समीक्षा

गुरूवार, 18 सप्टेंबर 2014 (17:23 IST)
कलाकार : नसीरुद्दीन शाह, डिंपल कपाडिया, पंकज कपूर, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर
कथा/पटकथा : होमी अदजानिया, केर्सी खंबाटा
संगीत : सचिन- जिगर, मॅथियास ड्युप्लेसी
निर्माते : दिनेश विजन
दिग्दर्शक : होमी अदजानिया
 
'फाईंडिंग फॅनी'ची स्टारकास्ट ऐकली, तेव्हाच हा चित्रपट पाह्यचाच असं ठरवलेलं! आणि ठरवल्याप्रमाणं तो पाहिला सुद्धा! चित्रपटानंही अजिबात निराश केलं नाही. होमी अदजानिया या प्रयोगशील दिग्दर्शकानं ‘बिईंग सायरस’ आणि ‘कॉकटेल’ नंतर आणखी एक चांगली कलाकृती निर्माण केली आहे.
 
तसं पाहता, चित्रपटात मुख्य पात्रं पाचंच! फर्डी (नसीरुद्दीन शाह) हा वयस्कर पोस्टमास्तर, काही कारणानं त्याचा तिरस्कार करणारी रोझी (डिंपल कपाडिया), विवाह पार पडता क्षणीच विधवा झालेली आणि तिच्यासोबत राहणारी तिची सून ॲन्जी (दीपिका पदुकोण), तिच्यावर प्रेम करणारा सॅव्हियो (अर्जुन कपूर) आणि एक लहरी चित्रकार पेड्रो (पंकज कपूर). चित्रपटाचं सारं कथानक घडतं गोव्यातल्या पोकोलीम या गावाच्या अवतीभवती. फर्डीनं त्याची प्रेयसी फॅनी हिला प्रपोझ करण्यासाठी म्हणून लिहीलेलं पत्र जवळ जवळ ४६ वर्षांनी त्याला पोस्ट न होताच परत मिळतं. दैवदुर्विलास असा की फर्डी स्वतः पोस्टमास्तर असूनही हे प्राक्तन इतक्या मोठ्या कालावधीनंतर त्याच्या वाट्याला येतं. म्हणजे, त्याचं प्रेम फॅनीकडं कधी व्यक्त झालेलंच नसतं. फर्डीची एकमेव मैत्रीण म्हणजे ॲन्जी. तिच्याजवळ तो आपल्या भावना व्यक्त करतो, तेव्हा ॲन्जी फर्डीचं प्रेम त्याला मिळवून देण्याचं ठरवते आणि त्या शोधयात्रेची खुमासदार कथा म्हणजे फाईंडिंग फॅनी!
 
सुरवातीला म्हटल्याप्रमाणं दिग्दर्शक होमी अदजानिया यानं या चित्रपटात कमाल केली आहे. एक छोटीशी कथा पण, तिला तत्वज्ञानाच्या पातळीवर नेऊन ठेवण्याचं काम त्यानं केलंय. त्याच्या या करामतीमुळं 'फाईंडिंग फॅनी' एक क्लासिक चित्रपट म्हणून गणला जाण्यास पात्र ठरला आहे. कलाकारांच्या निवडीतूनच त्यानं आपल्याला काय साध्य करायचं आहे ते ठरवलं आहे की काय, असं वाटून जातं. नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर यांच्या अभिनयाबद्दल नव्यानं काय बोलावं? केवळ अप्रतिम! डिंपल कपाडियाचं खूप दिवसांनी रुपेरी पडद्यावर होणारं दर्शन अत्यंत सुखद. 'रुदाली'नंतर आणखी एक हटके भूमिका डिंपलच्या वाट्याला आलीय आणि तिनंही त्या भूमिकेचं सोनंच केलंय. दीपिका पदुकोण ही आजच्या पिढीची एक समंजस अभिनेत्री. ग्लॅमरस भूमिकांत छाप पाडणाऱ्या या अभिनेत्रीनं ॲन्जीच्या भूमिकेतील विविध कंगोरे अगदी जबाबदारीनं पेश केले आहेत. आणि या सर्वांच्या समोर उभं राह्यचं म्हणजे खायची गोष्ट नाही, हे लक्षात घेऊन अर्जुन कपूरनंही सॅव्हियो त्याच्या आक्रमकतेसह उत्तम उभा केलाय. त्यामुळं या साऱ्यांच्या कसदार अभिनयासाठी 'फाईंडिंग फॅनी' हा अवश्य पाह्यला हवा.
 
अभिनयाबरोबरच ज्या गोष्टीच्या बळावर हा चित्रपट अधिक अपील होतो, ती म्हणजे यातले संवाद. मूळ इंग्रजी संवाद इतके खुसखुशीत आहेत की, त्याचं हिंदीकरण केल्यानंतरही त्यांची लज्जत गेलेली नाहीय. मूळ इंग्रजीतले आणि काही गोंवन संवाद जसेच्या तसे ठेवल्यामुळं चित्रपटाच्या कथेचा आणि सादरीकरणाचा इसेन्स कायम राहतो.
 
पण हा चित्रपट केवळ फॅनीची शोधकथा आहे, असं म्हणून सोडून दिलं तर मात्र दिग्दर्शकाच्या प्रयत्नांवर अन्याय केल्यासारखं होईल. चित्रपटातल्या पाचही एकाकी व्यक्तींची एकेक कथा आहे, त्यांच्या जीवन प्रवासाचीही ही कथा आहे- कधी प्रोडिक्टेबल कधी टोटली अनप्रेडिक्टेबल! समाजात प्रत्येक माणूस हा असाच तर वावरत असतो. त्याचं असणं, वावरणं हे क्षणोक्षणी बदलणारं आणि कित्येकदा बेगडी आव आणणारं! या बेगडीपणाला आवर नाही घालू शकलं कोणी, तर आपला वावर हा भ्रामक दुनियेत होत राहतो, जणू या दुनियेशी काहीच संबंध नसल्याप्रमाणं! मात्र, हे कचकडी आवरण कधी फुटलं, तेव्हा आपल्या खऱ्या माणूसपणाची कसोटी लागते. त्या कसोटीला जो उतरतो, तो उर्वरित आयुष्याच्या साऱ्या कसोट्या यशस्वीपणानं निश्चित पार करू शकतो, हा विश्वास हा चित्रपट जागवतो.
 
'फाईंडिंग फॅनी'च्या मांडणीचं मला सर्वात मोठं वैशिष्ट्य जाणवलं, ते म्हणजे शारीर आणि अशारीर अभिव्यक्तींच्या संदर्भात भाष्य करण्याचा प्रयत्न. अध्यात्माचे समर्थक शरीराला नेहमीच नश्वरत्व बहाल करून अशारीर तत्त्वज्ञान बिंबविण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात तथ्यही आहे. मात्र, अशारीर तत्त्वज्ञान रुजविण्यासाठी, अशारीर अभिव्यक्तीच्या पूर्णत्वासाठी शेवटी शारीरतेचा आधारच घ्यावा लागतो. त्याखेरीज हे तत्त्वज्ञान कणभरही पुढं सरकू शकणार नाही, हे मूलभूत किंवा पायाभूत तत्त्व 'फाईंडिंग फॅनी' पटवून देताना दिसतो. फर्डीला साठाव्या वर्षी आठवते ती त्याची षोडषवर्षीय प्रेयसी- जशीच्या तशी. स्वतःचं वय झालं असताना प्रेयसीचं वयही वाढलेलं असेल, ही कल्पना अखेरच्या क्षणापर्यंत त्याच्या मनाला शिवत नाही. अखेरीस तिला पाहिल्यानंतर त्याच्या मनात भावनांचा उद्रेक उडतो. मग त्याचं प्रेम शारीर असेल, तर ४६ वर्षांपर्यंत त्याला प्रत्युत्तराची वाट पाह्यला लावणारी जी प्रेरणा आहे, ती नेमकी कोणती- शारीर की अशारीर? 'पहली बार जब हो, तो अच्छे से हो,' असं सेक्सच्या बाबतीत थेट शारीर तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणारी नायिका फर्डीच्या ऐतिहासिक प्रेमकथेला सुखद अंत देण्यासाठी अखंड आटापिटा करते. मांजराच्या मरणाचं दुःख तिच्या डोळ्यांत दाटून येतं, यामागील अंतःप्रेरणा कोणत्या? रोझीला तिच्या नवऱ्याबद्दल सारं काही खरं ठाऊक असताना त्याची विधवा बनून आयुष्य कंठत असताना वस्तुस्थिती माहिती असणाऱ्या फर्डीचा तिरस्कार करण्याची आणि मांजरावर प्रेम दाखविण्याची तिची बेगडी प्रवृत्ती हे कशाचं निदर्शक? आणि महान कलाकार असणाऱ्या पेड्रोला आपल्या पेंटिंगसदृष अशारीर अभिव्यक्तीसाठीही अखेर शरीराचाच आधार घ्यावा लागतो, आणि कलाकृतीच्या निर्मितीनंतर त्या शरीराचं मोल मातीएवढंही न उरणं आणि तरीही हाती रितेपण येणं, याला काय म्हणावं? पुन्हा त्या कलाकाराच्या वाट्याला नश्वरता आहेच. आणि भले उशीरा असेल पण, कलाकृतीच्या वाट्यालाही नश्वरता येणार नाही, असंही नाही. म्हणजे शरीर हे नेमकं काय? साध्य की साधन? अशारीरता नेमकी काय? साध्यता की पुन्हा ती सुद्धा बेगडीच? प्रश्न कठीण आहेत. पण, त्या दृष्टीनं 'फाईंडिंग फॅनी' विचार करायला प्रवृत्त करतो खरा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच, एवढं लक्षात घेतलं, तर एकूणच शारीर-अशारीर आंदोलनांच्या अभिव्यक्तींचा सुवर्णमध्य साधून जीवनाचा प्रवास चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो, असा संदेश हा चित्रपट आपल्याला देतो.

- आलोक जत्राटकर 

वेबदुनिया वर वाचा