चित्रपट परीक्षण : वीजचोरी प्रश्नावर भाष्य करणारा ‘कटियाबाज’

सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (17:57 IST)
लोहा सिंग हा एक चाणाक्ष धूर्त असलेला कटियाबाज आहे. ही गोष्ट आहे कानपूर नजीकच्या परिसरातील जिथे शेकडय़ाने कारखाने होते, त्यांची संख्या 200-250 वर येऊन ठेपली आहे. विजेचा प्रश्न जितका गहन झाला, तेवढं या कटियाबाजांचं फावलंय. कारण प्रत्येकाला वीज हवीय.. उद्योगासाठी असेल, शेतीसाठी असेल वा घरासाठी असेल प्रत्येकासाठी हे सारं महत्त्वाचं झालं आहे, पण त्यामुळे ज्या गोष्टींची गरज असते अन् त्याची उणीव भासू लागली की त्याची किंमत वाढते, हे तर साधं इकॉनॉमिक्स आहे.
 
दीप्ती कक्कड अन् फहद मुस्तफा यांनी नेमकं हे जोखलं अन् कटियाबाजसारखा एक वेगळा प्रयत्न त्यांनी करण्याचं योजलं. या सगळ्या गोष्टी पाहताना एक वेगळा माहोल आपल्यासमोर आहे, त्यांचं बोलणं वागणं या सार्‍याला प्युअर देसी घी चा स्वाद आहे. वीजप्रश्न असं म्हटल्यावर आपल्याला त्यामधला लोहा सिंह यापुढे मनात राहील, कारण लोहा सिंग हा असा माणूस आहे की, ज्याच्याकडे वीजप्रश्नावर उत्तर आहे. कारण तो उत्तम कटियाबाज आहे. कानपूरचा माहिर कटियाबाज असणारा लोहा सिंह हा ज्यांना वीज प्रश्नाने भेडसावलाय, त्यांच्यासाठी तो देवदूत आहे, मसीहा आहे. त्यांच्या वीजप्रश्नाचा तारणहार म्हणून ते त्याच्याकडे पाहताहेत. त्याच्या कामाची तर्‍हाच अजब आहे, कारण काही करायचं, पण आपला आकडा लागला पाहिजे, याची पूर्ण जबाबदारी त्याने घेतलेली आहे. 
 
कधी कधी त्याच्या या आततायीपणामुळे ट्रान्सफॉर्मर्स खराब झाले आहेत, पण त्यावर आकडा टाकून आपलं काम करून घेण्यात निष्णात असलेला माहिर कटियाबाजचं हे जाळं चांगलंच पसरलंय. लोहा सिंगला हे सारं करण्यात किक मिळतेय, कारण आपण हे सारं करून बहादुरीचं काम करतोय, असं त्याला वाटतंय. आता खरी सुरूवात होते की, त्या सगळ्या गोष्टींना आवर घालण्यासाठी आता तू माहेश्वरी आलीय, ती नोकरशहा आहे. आयएएस ऑफिसर अत्यंत प्रामाणिक अन् कर्तव्यदक्ष त्यामुळे तिला आता त्या सार्‍या गोष्टींना चाप लावायचा आहे. तिला या सगळ्या गोष्टींमध्ये वीजदेयकाचा भरणा वेळेत करण्याचा पुरस्कार करण्यापासून तिने नवीन उपक्रम राबवलाय अन् त्या अंतर्गत विजेची चोरी करणार्‍यांना धडा शिकवून जबर दंड करण्याचं फर्मान तिने काढलं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये तिच्या विभागातील कर्मचार्‍यांचाही विरोध आहे अन् अर्थात एक मोठी लॉबी तिच्या विरूद्ध कारस्थान करण्यात मश्गुल आहे. त्यामुळे ती तिचं कर्तव्य चोखपणे बजावत असली तरी काही जणांच्या नजरेत ती आता व्हिलन बनलीय.
 
ही गोष्ट या अनोख्या संघर्षाची आहे. केवळ वीजचोरी अन् त्याला रोखण्याचा प्रयत्न इथपर्यंत हे सारं मर्यादित राहत नाही. त्यामध्ये एक अनोखी गंमत आहे. त्या सिनेमाची मांडणी अन् त्यामध्ये असणारा एक अनोखा फ्लेवर यामुळे हा सिनेमा आणखी रंगतदार झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा