चित्रपट परीक्षण : भूतनाथ रिटर्न

शनिवार, 12 एप्रिल 2014 (14:29 IST)
निर्माता : भूषण कुमार, कृष्णकुमार, रेनू रवी चोप्रा
दिग्दर्शक : नितेश तिवारी
कलाकार : अमिताभ बच्चन, बोमण इराणी, पार्थ भालेराव आदी.

कथा : भूतनाथ (अमिताभ) इहलोकातून भूतलोकात जातो आणि तिथे गेल्यावर तेथील भूते त्याला पाहून हसू लागतात. लहान मुलांनाही तो घाबरू शकला नाही म्हणून हसतात. भूताच्या जातीला बट्टा लावला म्हणून हिणवतात. म्हणून भूतनाथ पुन्हा आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लोकवस्तीत जातो. तिथे त्याची गाठ पडते झोपडपट्टीत राहणार्‍या आक्रोटशी (पार्थ). हा पार्थ एकटाच या भूतनाथला पाहू शकतो. त्यांच्यात दोस्ती होते. ते एकमेकांना मदत करण्याचे ठरवतात. या दोघांची गाठ पडते ती देशातील सर्वात भ्रष्टाचारी आणि ताकदवार असलेल्या भाऊशी (बोमण इराणी). लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असतात. भाऊ निवडून येणार, हे ठरलेले असते. अशा वेळी भूतनाथ भाऊला आव्हान देतो आणि चांगल्याची, सत्याची वाईटाशी, भ्रष्टाचाराशी लढाई सुरू होते.

दिग्दर्शन : नितेश तिवारी यांनी चांगला प्रय▪केला आहे; परंतु तिवारी मध्यंतरानंतर भूतनाथाला विसरूनच गेले की काय, असे वाटू लागले. भूत अदृश्य असते.. ते आक्रोटशिवाय कुणाला दिसत नसते.. मात्र तरीही लोक भूताकडेच का पाहतात, हे गणित काही सुटले नाही. अजूनही बर्‍याच चुका आहेत, ज्याकडे दिग्दर्शकाने लक्ष दिले नाही. मात्र तरीही स्टार कास्टच्या जोरावर बाजी मारली गेली आहे.

अभिनय : सुपरस्टार अमिताभ यांच्या अफलातून अभिनयाने एक विनोदी हॉरर चित्रपट यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. बोमण आणि पार्थ यांनी बच्चन यांना चांगलीच साथ दिली आहे. केवळ त्यांच्यासाठीच हा चित्रपट पाहायला हवा. अमिताभ बच्चन मतदारांना मतदान करण्यासंबंधी समजावताना दिसतात. एकूणच हा चित्रपट निवडणुकीचा प्रचार करण्यासाठीच निर्माण केला की काय, असे वाटू लागते. मात्र याचा उपयोग निवडणूक आयोगाला होऊ शकतो. 

गीत-संगीत : यातील गीते अगोदरच लोकांना ठेका लावायला लागली आहेत. त्यामुळे सुंदर असे गीत संगीत आहे. यो यो हनी सिंग, अंजान राम संपथ, मीत ब्रदर्स, पलाश मुच्छल या संगीत करांनी कथेला साजेसे संगीत दिले आहे.

थोडक्यात : निवडणूक आयोग भविष्यात हा चित्रपट 'करमुक्त' करू शकेल, यात वाद नाही.. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा चित्रपट आल्यामुळे जर मतदान करणार्‍या टक्क्यांमध्ये वाढ झाली तर त्याचे श्रेय 'भूतनाथ रिटर्न'ला द्यायलाच हवे. फॅण्टसी, कॉमेडी आणि हॉरर या त्रिसूत्रीचा वापर करून दिलेला मतदानाचा संदेश पाहण्यासाठी स्वत:च्या खिशातले पैसे खर्च करायला काहीच हरकत नाही.. मनोरंजनाची हमी आहे!

वेबदुनिया वर वाचा