हेलिकॉप्टर ईलाच्या निमित्ताने

शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (00:49 IST)
प्रत्यक्ष आयुष्यात काजोल दोन मुलांची आई आहे. 'हेलिकॉप्टर ईला'मध्ये ती सिंगल मदरची भूमिका करते आहे. आपल्या एकुलत्या एका मुलाभोवती आयुष्य शोधणार्‍या आईच्या भूमिकेत ती आहे. 'हेलिकॉप्टर पालकत्त्व' ही संकल्पना पाश्चिमात्त्य जगात परिचित आहे. मुलांच्या आयुष्यात आणि जडणघडणीत गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करणार्‍या पालकांसंदर्भात हा शब्द वापरला जातो. अशी अनोखी संकल्पना असलेल्या चित्रपटात काम करताना आलेले अनुभव ती शेअर करते.
 
काजोल म्हणते, चित्रपटाचे लेखक आनंद गांधी आणि मितेश शहा माझ्याकडे ही कथा घेऊन आले होते. आपल्याकडे अशा प्रकारची कथा असल्याचं त्यांनी मला सांगितलं. ही कथा मी ऐकावी अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार मी ती ऐकली. मला ही कथा प्रचंड आवडली. हे काही तरी वेगळं आहे आणि मला हा चित्रपट करायला खूप आवडेल असं एका क्षणात वाटून गेलं. अजयही त्यावेळी तिथे होता. मला ही कथा खूप आवडल्याचं कळल्यानंतर तोही या चर्चेत सामील झाला. तुला ही कथा खूप आवडली असेल तर आपण चित्रपटाची निर्मिती करू, असं त्याने मला सांगितलं. यामुळे मी खूप खूश झाले. ही कथा ऐकल्यानंतर मी लगेचच प्रतिक्रिया दिली. हा चित्रपट मी करणार असल्याचं सांगून टाकलं. इतरांचा विचारही करू नका, असंही स्पष्ट केलं.
 
चित्रपटाच्या कथेबद्दल काजोल म्हणते की, यात फक्त हेलिकॉप्टर पॅरेंटिंग ही संकल्पना घेतलेली नाही तर अजून बरंच काही आहे. यातली ईला खूप विनोदी आहे. चित्रपटात विनोदही आहे. सोबतच यातून संदेश देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. मुलाचं आपल्या आईसोबतचं नातं यात दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या आईने मुलाला एकटीने वाढवलं आहे. त्यामुळे तिचे त्याच्यासोबत विशेष ऋणानुबंध आहेत. अशा परिस्थितीत आई आणि मुलाचं नातं खूप गहिरं असतं. त्याला बरेच कंगोरे असतात. आईने केलेली ढवळाढवळ मुलांना आवडत नाही. पण त्याच वेळी आईबद्दल काहीही ऐकून घ्यायला ही मुलं तयार नसतात. आईच्या पाठीशी ही मुलं उभी राहतात. ईला आणि तिच्या मुलामध्ये अशा प्रकारचं नातं निर्माण झालं आहे. तेच तुम्हाला 'हेलिकॉप्टर ईला'मध्ये पाहता येईल. अत्यंत संवेदनशील, हळवा पण मनापासून हसवणारा असा हा चित्रपट पालक आणि मुलं दोघांनाही खूप आवडेल, अशी मला खात्री आहे.
 
नितीन शिंदे 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती