राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चिरंजीव राजेंद्र शेखावत यांनी अमरावतीतून कॉंग्रेसच्या तिकिटावर लढण्याची तयारी दर्शविल्याने नवा वाद उद्भवला आहे. एकतर राष्ट्रपतीपुत्राने निवडणूक लढवावी काय हा नैतिकतेचा प्रश्न तर आहेच, पण याच जागेचे १९९५ पासून प्रतिनिधित्व केले विद्यमान आमदार व राज्यमंत्री सुनील देशमुखही त्यामुळे अस्वस्थ झाले आहेत.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे सध्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. श्री. शेखावत यांनी गुरूवारी या दोघांसमोर आपल्या उमेदवारीचा दावा पेश केला. मी केवळ राष्ट्रपतींचा मुलगा आहे, म्हणून निवडणूक लढवू शकत नाही, या मताला काहीच अर्थ नाही, असे सांगून मी गेल्या दहा वर्षापासून कॉंग्रेसमध्ये सक्रिय कार्यरत आहे, असा दावा त्यांनी केला. रावसाहेब म्हणून ओळखल्या जाणार्या शेखावत यांनी आपल्या कर्तृत्वाचा पाढा यावेळी वाचून दाखवला. श्री. शेखावत आधी मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस होते. पण त्यानंतर ते अमरावतीत परत गेले. गावचा विकास आपल्याला करायचा होता, म्हणून आपण तिकडे जाणे पसंत केले, असे ते म्हणाले. दरम्यान, शेखावत यांच्या उमेदवारीवर भाष्य करण्यास निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख व ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी नकार दिला.
त्याचवेळी अमरावतीतून विद्यमान आमदार असलेले आणि सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्रिपद भूषविणारे सुनील देशमुख श्री. शेखावत यांच्या दाव्याने अस्वस्थ झाले आहेत. ' श्री. शेखावत यांच्या दाव्याने आपण आश्चर्यचकित झाल्याचे सांगून ते म्हणाले, १९९९ पासून मी या जागेवरून निवडून येतो आहे. शेखावत आपण स्थानिक असलो तरी त्यांची तिथे काहीही ताकद नाही. ते अमरावतीचे नागरिकही नाहीत. केवळ आईचे नाव वापरून ते राजकारण करू पहात आहेत. त्यांचे वडिल देवीसिंह शेखावत १९९५ मध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर हे सगळे कुटुंब मुंबईत स्थलांतरीत झाले होते, याची आठवणही श्री. देशमुख यांनी करून दिली.
श्री. शेखावत यांनी २००४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वरळी मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र, तीही त्यांना नाकारण्यात आली होती, याकडेही देशमुख यांनी लक्ष वेधले.