`दसरा' हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळयात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वहातात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला.