अरेरे ! काय हा आकस्मिक आघात....

वेबदुनिया

शुक्रवार, 11 डिसेंबर 2009 (19:27 IST)
ND
ND
वैशाली, स्वतःच्याच घरात येऊन आज पंधरवडा उलटला. या पंधरा दिवसातला प्रत्येक दिवस उदास नि चिंतेत ढकलणारा गेला. जवळपासहून मिळणारी किंवा लांबून येणारी प्रत्येक बातमी काही तरी अस्वस्थ करणारी किंवा भय देणारी ठरली आहे. कधी काळी एम्नी सेजेयरची एक दीर्घकविता वाचली होती, 'रिटर्न टू माय नेटिव्हलॅंड'. आपण आपली भाषा आणि समाजाप्रती इतके विन्मुख का होतो?

इतक्या दिवसांनंतरही पुन्हा औदासिन्य आणि एकलेपणाचीच चर्चा करायला लागलो, असं तुम्ही म्हणाल, ठीक आहे, हे इथेच सोडून देतो. पण हा ब्लॉग हीच अशी जागा आहे, जिथे मी माझं दुःख आणि आनंद नेहमीच तुमच्याबरोबर वाटत राहिल. हे म्हणजे स्वतःच स्वतःशी संवाद साधल्यासारखे आहे किंवा आपल्यापासून सुटे होत इतरांपर्यंत किंवा मुक्तीबोधांच्या शब्दांत सांगायचं तर कुण्या आत्मिक सहचराशी किंवा समानधर्मीपर्यंत पोहोचण्यासारखे आहे.

जवळपास दोन महिने मी जर्मनीत होतो. चार दिवस फ्रान्समध्ये. तब्बल बावीस कार्यक्रम. कवितावाचन, व्याख्यान आणि मुलाखतीचे. तेही वेगवेगळ्या शहरांत, वेगवेगळ्या तारखांना. काही जर्मन मित्रांनी तर सांगूनही टाकलं, आमचा देश आम्ही जितका नाही, पाहिला तेवढा तुम्ही पाहूनही टाकला.

प्रवास नि प्रवास.

(अरेरे ! हे काय झालं? मी हे टाईपच करतो आहे आणि हा आघात झाला.....

आमचे प्रिय मित्र आमच्या समकालीन सर्वोत्कृष्ट कवींपैकी एक असलेले दिलीप चित्रे यांचे निधन झाले...

काही वेळापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांना कर्करोग झाला होता. फेसबुकवर नेहमी ते भेटत असत. शेवटपर्यंत ते प्रसन्न आणि चैतन्यशील होते.

हा अतिशय शोकात्म असा काळ आहे. १९७५ पासून त्यांच्याशी परिचय होता. त्यावेळी ते गोदान नावाचा चित्रपट बनवत होते. २००६ च्या फ्रॅंकफर्ट जागतिक पुस्तक मेळाव्यात आम्ही बरोबर होतो. अगदी आत्ताच गेल्या वर्षी दिल्लीतील जागतिक पुस्तक मेळ्यातही ते भेटले होते.

त्यांचे जीवन एकीकडे सृजनात्मकतेच्या शिखराला स्पर्श करत होते, त्याचवेळी वैयक्तिक जीवनात अनेक दुःखद घटनांशी आणि वेदनांशी ते झगडत होते. हे फार कमी लोकांना माहिती आहे, की त्यांचा मुलगा भोपाळच्या वायू दुर्घटनेचा बळी ठरला होता. त्याच्या मृत्यूने ते आतून पार हलले होते.

ते एक अस्सल कवी आणि लेखक होते.

त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करायला हवी. आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. )

मराठीतील सारे मित्र यावेळी या धक्क्यात असतील. मला ही बातमी काही वेळापूर्वीच उडिया कवी मनू दास यांनी कळवली.

दिलीप चित्रे यांचे वेबवर एक खासगी आयुष्यही होते. त्यात ते काही ना काही लिहित असायचे. आता मात्र ती जागा कोरी राहिल. कायमचीच.
( उदय प्रकाश हे हिंदीतील मान्यवर लेखक आहेत. त्यांच्या ब्लॉगवरून साभार.)

(अनुवाद-अभिनय)

वेबदुनिया वर वाचा