Diwali Padwa 2023 या दिवशी काय करावे जाणून घ्या

अन्नकूट
कार्तिक शुक्ल प्रतिपदा या दिवशी जेवणात नेहमीच्या पदार्थांखेरीज यथाशक्ती इतर पदार्थ करुन त्यांचा श्रीकृष्णास नैवेद्य दाखवावा. या दिवशी ब्राह्मणांना पोटभर अन्न वाढून उरलेले इतर इच्छुकांना द्यावे. गोवर्धन पूजेचाच हा एक विधी आहे. यादिवशी मिठाईच्या पदार्थांची देवापुढे रास उभारतात. 
 
 
बलिप्रतिपदा
कार्तिक शुक्ल प्रतिपदा विक्रम संवत्सराचा आरंभ दिवस. पाडवा हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी अर्धा मुहुर्त आहे. या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान करून नवीन वस्त्र परिधान करावे. ह्या दिवशी सार्वजनिक लोकोपयोगी कार्यास प्रारंभ करावा. या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या पतीस ओवाळावे. रात्री बळीची पूजा करून त्यास दीपदान करावे. गादीवर तांदळाने बळीची आकृती काढून तिची पूजा करावी. ह्या दिवशी रात्री खेळ, गायन वगैरेंचा कार्यक्रम करून जागरण करावे.
 
गोवर्धनपूजा
दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी सकाळी घराच्या दाराजवळच्या भागात शेणाने गोवर्धनपर्वताचा आकार तयार करुन पूजा करावी.
 
'गोवर्धन घराघर गोकुलत्राणकारक
विष्णुबाहुकृतोच्छाय गवांकोटि प्रदोभव ।'
 
नंतर भूषणीय गाई-बैलांना आवाहन करून यथाविधी पूजा करावी. त्या दिवशी गाईचे सर्व दूध वासरांना पाजावे.
 
'लक्ष्मीर्या लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता ।
घृतं वहति यज्ञार्थे मम पापं व्यपोहतु ।'
 
अशी प्रार्थना करून रात्री गाईंकडून गोवर्धनाचे उपमर्दन करावे.
 
वहीपूजन 
या दिवशी व्यापारी लोक आपल्या जमाखर्चाच्या वह्या, शाईची दौत, लेखनसाहित्य यांची पूजा करतात, काही व्यापारी या दिवसापासून व्यापारी वर्ष चालू करतात. हेच ते विक्रमसंवत्सर होय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती