विकसनशील परंपरेत हे फक्त मानवतेपर्यंत मर्यादीत न राहता 'सर्वभूतहिते' हा त्याचा मुख्य आदर्श आहे. प्राणीमात्रावर फक्त दया न करता प्रेम करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. आपण देवांवर दया करत नाही तर देवावर प्रेम करतो व त्यांची पूजा करतो. म्हणूनच प्राण्यांमध्ये जर देव वसत असतील तर त्यांच्यावरही दया न करता त्यांचे पूजन केले पाहिजे. त्यांवर प्रेम केले पाहिजे. म्हणूनच भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मानवाच्या अंत:करणात प्राणीमात्रांसाठी आदर असला पाहिजे. भारतीय संस्कृती मानवाला पूर्ण सृष्टीवर प्रेम करावयास शिकविते. पृथ्वीतलावर गायीचे महत्त्व खूप जास्त आहे.