वर्ल्ड कप IND vs AUS : 2003 ची फायनल ते 2023 फायनल पर्यंत काय काय बदललंय?
रविवार, 19 नोव्हेंबर 2023 (13:28 IST)
वीस वर्षांपूर्वी 23 मार्च 2003 रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत होते.
सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंग कर्णधार होते. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला.
जोहान्सबर्गमधील वांडरर्स स्टेडियम सुमारे 32 हजार प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू रांगेत उभे होते.
'जन-गण-मन' वाजू लागल्यावर माझ्या अंगावर अक्षरशः काटे उभे राहिले. सर्वकाही रोमांचित झालेलं. माझ्या पायाखाली एक विचित्र थरथर जाणवत होती. 'जय हे, जय हे, जय हे. 'जय, जय, जय, जय हे', च्या सूरांनी संपूर्ण स्टेडियम दुमदुमून गेलेलं.
त्या क्षणांचं शब्दात वर्णन केलं जाऊ शकत नाही, ते फक्त अनुभवता येतात. एक वार्ताहर म्हणून मीही तिथे होतो आणि हे सगळं अनुभवलं.
पण काही तासांनंतर, अभिमानाच्या भावनांचे पश्चातापाच्या क्षणात रूपांतर झालं कारण भारतीय संघ कुठलाही संघर्ष न करता अंतिम फेरीत पराभूत झाला.
असं दिसतं की, 20 वर्षांमध्ये काळाचं एक चक्र पूर्ण झालंय आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहेत. तेव्हापासून बरंच काही बदललंय आणि इतिहास देखील बदलू इच्छितोय.
2003 मध्ये ऑस्ट्रेलियन संघ वरचढ होता. भारताने दोन सामने गमावल्यानंतर अंतिम फेरी गाठली होती तर ऑस्ट्रेलिया अपराजित राहून अंतिम फेरीत पोहोचलेला आणि यावेळी भारतीय क्रिकेट संघाने वर्चस्व राखलंय आणि फक्त भारतीय संघच अंतिम फेरीपर्यंत अपराजित राहिलाय.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2003 च्या भारतीय संघाप्रमाणे ऑस्ट्रेलियाने 2023 मध्ये दोन सामने गमावून अंतिम फेरीत प्रवेश केलाय.
यावेळी परिस्थिती वेगळी
तेव्हाचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका या तटस्थ देशात खेळला गेला. गेल्या वेळी दोन्ही संघांना 32 हजार प्रेक्षक पाठिंबा देत होते. यावेळी स्टेडियममध्ये एक लाख 32 हजार प्रेक्षक उपस्थित राहणार असून त्यांचा उत्साह आणि गोंगाट आसमंतात घुमणार आहे. घरच्या मैदानावर आणि प्रेक्षकांसमोर टीम इंडियाचा विजय रथ रोखणं कांगारूंसाठी अजिबात सोपं जाणार नाही.
तुलनात्मक अभ्यास असं दर्शवतोय की इतिहास एक वळण घेतोय. या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेला. पहिल्या दोन षटकांत तीन विकेट पडल्यानंतरही भारत सामना जिंकण्यात यशस्वी झालेला. सामन्यात विराट कोहलीने 85 धावांची आणि के.एल. राहुलने 97 धावांची नाबाद खेळी केलेली.
2003 विश्वचषकाच्या साखळी सामन्यात सेंच्युरियनमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झालेला. ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली आणि जेसन गिलेस्पी यांनी भारताचा डाव अवघ्या 125 धावांत गुंडाळलेला. ऑस्ट्रेलियाने 23 व्या षटकातच नऊ विकेट्स राखून सामना जिंकला.
अंतिम फेरीत जेव्हा दोन्ही संघ पुन्हा समोरासमोर आले तेव्हा कर्णधार रिकी पाँटिंगने 121 चेंडूत 141 धावांची नाबाद खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या 359 धावांच्या दडपणाखाली भारतीय डाव गडगडला.
सचिन तेंडुलकरला चार, सौरव गांगुलीला २४ धावा करता आल्या आणि मोहम्मद कैफला खातंही उघडता आलं नाही. वीरेंद्र सेहवागने 82 आणि राहुल द्रविडने 47 धावा करत थोडा संघर्ष केला पण ऑस्ट्रेलियाने 125 धावांनी विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा चषकावर आपलं नाव कोरलं.
भारतीय चाहत्यांना कथेची पुनरावृत्ती व्हावी असं वाटतं परंतु त्यातील पात्र बदलायला हवीत. म्हणजे विजेता संघ भारत असावा आणि भारताने तिसऱ्यांदा विश्वविजेता व्हावं.
वर्ल्ड कपमधील आतापर्यंतच्या सामन्यांवरून स्पष्ट झालं की, यावेळी भारतीय संघाचा वरचष्मा आहे. भारताने बहुतांश सामने खात्रीने जिंकले आहेत. वरच्या फळीत कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली फॉर्मात आहेत. श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल यांनी मधल्या फळीत आपली भूमिका चोख बजावलेय.
टॉप-5 मध्ये एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज नाही
भारतीय गोलंदाजीचं आतापर्यंतची सर्वोत्तम असं वर्णन केलं जातंय. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी विरोधी फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिलेले नाही. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी मधल्या षटकांमध्ये एकाही फलंदाजाला वरचढ होऊ दिलेले नाही.
हे पाहता, सर्वकाही सुरळीत चाललंय. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण एकत्रित मिळून काम करत असतील, तर अशा आदर्श परिस्थितीत संघाचा विजयरथ कुणीही रोखू शकत नाही.
संघभावनेचा मुद्दा यासाठीही महत्त्वाचा आहे कारण 2003 च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 673 धावा केल्या होत्या. दुसऱ्या स्थानावर सौरव गांगुली होता त्याने 465 धावा केल्या. रिकी पाँटिंग 415 धावांसह तिसऱ्या स्थानावर होता. भारतीय खेळाडूंची कामगिरी अव्वल होती पण सांघिक कामगिरीत ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा होता.
विराट कोहलीने यावेळी मागील सर्व विक्रम मोडीत काढत अंतिम सामन्यापूर्वीच सर्वाधिक 711 धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माने 550 धावा केल्या असून तो अंतिम फेरीत दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो.
ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज पहिल्या पाचमध्ये नाही. 2003 मध्ये पहिल्या पाचमध्ये दोन फलंदाज होते, यावेळी विराट आणि रोहित अंतिम फेरीपूर्वीच पहिल्या पाचमध्ये आहेत.
सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच माझी योजना अशाच प्रकारचं क्रिकेट खेळण्याची होती. ती काम करेल की नाही हे मला माहीत नव्हतं. मला माझा खेळ बिनधास्तपणे खेळायचा होता. मी इंग्लंडविरुद्ध माझा खेळ बदललेला, वरिष्ठ खेळाडूंना हे करावं लागतं.”
"मला जास्त उत्साहित व्हायचं नाहीए. मला दडपण घ्यायचे नाहीए. मला वाटतं की सामन्याच्या दिवशी चांगलं क्रिकेट खेळणं महत्त्वाचं आहे. गेल्या 10 सामन्यांमध्ये मी काय केलं याने काही फरक पडत नाही. होय, आत्मविश्वास नक्कीच मिळतो.”
ऑस्ट्रेलियाला हलक्यात घेता कामा नये
परंतु भारतीय संघाने थोडासाही निष्काळजीपणा दाखवता कामा नये. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ जुना दिग्गज आहे. पाच विश्वचषक जिंकलेल्या संघाला फायनल कशी जिंकायची हे माहीत्येय.
पहिले दोन सामने गमावल्यानंतर अनेकांनी ऑस्ट्रेलियाला बाजूला काढलं. मात्र, ऑस्ट्रेलियन कधीच मानसिकदृष्ट्या कमकुवत नव्हते.
कांगारूंनी दमदार पुनरागमन करत त्यांचे शेवटचे सातही सामने जिंकले आणि उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून आठव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केलं.
मात्र, संघाच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव स्पष्टपणे दिसून येतोय. भारतीय संघापेक्षा विरूद्ध वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर कांगारू अंतिम फेरीत पोहोचलेत.
सेमीफायनलमध्ये जोस हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांनी दाखवलेली लढाऊ वृत्ती धोक्याची घंटा आहे. ट्रॅव्हिस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल मधल्या षटकांमध्ये धावसंख्या नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात.
आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर, भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकात 13 वेळा आणि अंतिम फेरीत एकदाच आमनेसामने आले आहेत. या 13 सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने आठ आणि भारताने पाच सामने जिंकलेत.
एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 150 लढती झाल्या आहेत ज्यात कांगारू 83 वेळा विजयी झालेत आणि भारतीय संघ 57 वेळा विजयी झालाय.
2011 मध्ये भारताने 28 वर्षांनी एकदिवसीय विश्वचषक जिंकलेला. रोहित शर्माला त्या संघात स्थान न मिळालं नव्हतं म्हणून आजही कर्णधार म्हणून त्याला त्याचं दु:ख आहे.
तो म्हणाला, “2011 हा माझ्यासाठी भावनिक आणि कठीण काळ होता पण या टप्प्यावर मी खूप आनंदी आहे, मी अंतिम सामन्यात संघाचे नेतृत्व करेन असे कधीच वाटलं नव्हतं. मला फक्त संघात माझं स्थान निर्माण करायचं होतं.”
साहजिकच रोहित शर्मासाठी महान कर्णधारांच्या यादीत आपलं नाव नोंदवण्याची ही उत्तम संधी आहे.
रोहित शर्माने अलिकडेच सांगितलेलं, "आता अशी वेळ आलेय की तुम्हाला भाग्याचीही थोडी साथ हवेय, नशीब तुमच्या सोबत असेल. अर्थातच, आम्ही धैर्याने खेळू आणि आशा आहे की नशीब शूरांना साथ देईल."
2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यापासून भारताला आयसीसीचे विजेतेपद मिळालेलं नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि कंपनीला दहा वर्षांनंतर नवीन इतिहास रचायचाय.