IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियाचा भारतावर 6 विकेटनं विजय, भारताचे वर्ल्डकपचे स्वप्न भंगले
रविवार, 19 नोव्हेंबर 2023 (21:36 IST)
ऑस्ट्रेलियान वर्ल्डकप फायनल मध्ये भारताचा सहा विकेट राखून पराभव केला
घरच्या मैदानावर भारताला वर्ल्डकपने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने सहावा वर्ल्ड कप जिंकला.
वर्ल्डकपच्या सुरुवातीला जखमी असूनही ऑस्ट्रेलियाने संघात ठेवलेल्या ट्रेव्हिस हेडने फायनल आणि सेमी फायनलमध्ये अप्रतिम कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप मिळवून दिला.
ट्रेव्हिस हेडने सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अर्धशतकी खेळी करून संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती.
ट्रेव्हिस हेड आणि लाबुशेनने मिळवून दिला विजय
शमी आणि बुमराने पहिल्या दहा ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट काढल्यानंतर ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेनने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.
ट्रेव्हिस हेडने 120 बॉलमध्ये 137 धावांची खेळी केली तर दुसऱ्या बाजूला मार्नस लाबुशेनने 110 बॉलमध्ये 58 धावांची संयमी खेळी केली.
टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय ऑस्ट्रेलियाला ठरला फायदेशीर
टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच भारतावर दबाव बनवला होता.
रोहित शर्माने भारताला आक्रमक सुरुवात तर दिली पण त्यानंतर नियमित अंतराने विकेट पडल्याने भारताचा संघ 240 धावाच करू शकला.
संपूर्ण वर्ल्डकपमध्ये एकदाही ऑल आउट न झालेला, एकही मॅच न हरलेला भारतीय संघ फायनलमध्ये मात्र दबावात आला होता.
रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमीसह इतर भारतीय खेळाडूंनाही कांगारूंसमोर लयच सापडली नाही आणि पुन्हा एकदा भारताला आयसीसी स्पर्धेतील विजयाला मुकावं लागलं.
पहिल्या डावात पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड आणि झाम्पाच्या अप्रतिम गोलंदाजीसमोर एकही भारतीय फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.
या मैदानावर जबरदस्त रेकॉर्ड असलेल्या शुबमन गिलला 4 धावांवर बाद करत मिचेल स्टार्कनं भारताला पहिला धक्का दिला.
कर्णधार रोहित शर्मानं नेहमीच्या थाटात फलंदाजी करत 31 बॉलमध्ये 47 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडनं मागं पळत जात त्याचा अप्रतिम झेल घेतला. रोहित शर्मा या स्पर्धेत 40 ते 49 दरम्यान पाचव्यांदा बाद झाला.
कोहलीचा विक्रम
रोहित पाठोपाठ श्रेयस अय्यरही 4 धावांवर बाद झाल्यानं टीम इंडिया अडचणीत आली होती. त्यावेळी विराट कोहली आणि के.एल. राहुल या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागिदारी करत ही पडझड रोखण्याचा प्रयत्न केला.
विराट कोहलीनं त्याचं अर्धशतक 56 बॉलमध्ये पूर्ण केलं. तो अर्धशतकानंतर फार टिकला नाही. त्याला 54 धावांवर पॅट कमिन्सनं चकवलं.
विराटनं या विश्वचषक स्पर्धेत 6 अर्धशतक आणि 3 शतकांसह 765 धावा केल्या. हा एक विक्रम आहे. एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा 20 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड त्यानं मोडला.
राहुलचं संयमी अर्धशतक
विराट बाद झाल्यानंतर रविंद्र जाडेजाला प्रमोशन देण्याची चाल यशस्वी ठरली नाही. तो फक्त 9 धावांवर बाद झाला.
के.एल. राहुलनं एक बाजू लावून धरत संयमी अर्धशतक झळकावलं. त्यानं 107 बॉलमध्ये फक्त एक चौकार लगावत 66 धावा केल्या. मिचेल स्टार्कनं राहुलला बाद केलं.
राहुल बाद झाल्यानंतर भारतीय संघ संपूर्ण 50 ओव्हर खेळणार का? हा प्रश्न होता. कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज या शेवटच्या जोडीनं 15 बॉल खेळून काढत ते टार्गेट पूर्ण केलं.
ऑस्ट्रेलियन फिल्डर्सची कमाल
ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांनी संपूर्ण सामन्यात उत्तम फिल्डिंग करत भारतीय फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. हेडनं अप्रतिम झेल घेत भारताला बॅकफुटवर ढकललं.
भारतीय फलंदाजांना 11 ते 40 ओव्हर्सच्या दरम्यान फक्त 2 चौकार लगावता आले.
ऑस्ट्रेलियनं गोलंदाजांनीही धिम्या पिचचा फायदा घेत अचूक गोलंदाजी केली. मिचेल स्टार्कनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हेझलवूड आणि कमिन्सला प्रत्येकी 2 तर झम्पा आणि मॅक्सवेलला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
फटकेबाजीच्या नादात रोहित, अय्यर स्वस्तात परतले
रोहितने संपूर्ण स्पर्धेतला त्याचा आक्रमक अंदाज कायम ठेवत ग्लेन मॅक्सवेलला षटकार आणि चौकार खेचून त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण चौथ्या बॉलवर ट्रेव्हिस हेडने मागे पळत जाऊन आक्रमक कॅच घेत रोहित शर्माला तंबूचा रस्ता दाखवला.
आउट होण्यापूर्वी रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दीड लाख प्रेक्षकांना शांत केलं
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने फायनलच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एक विधान केलं होतं.
फायनल बघायला आलेल्या सुमारे दीड लाख प्रेक्षकांना शांत करण्यात जो आनंद आहे तो कशातच नसल्याचं तो म्हणाला होता.
ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने केलेल्या या विधानाला खरं ठरवत बॉलर्सनी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना चांगलंच जखडून ठेवलं. स्वतः पॅट कमिन्सने 10 ओव्हरमध्ये 34 धावा देत दोन विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाच्या इतरही बॉलर्सनी कंजूस बॉलिंग केली. रोहित आणि विराटने भारताचा डाव तर सावरला पण तब्बल सोळा ओव्हरपर्यंत त्यांना एकही चौकार लगावता आला नाही.
ग्लेन मॅक्सवेल, मिच मार्श आणि ट्रेव्हिस हेड या तिघांनी मिळून पाचव्या बॉलर्सचा कोटा पूर्ण केला. त्यांनी 10 ओव्हर्समध्ये 41 धावा देत 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाच्या पार्ट टाईम गोलंदाजांना टार्गेट करण्यात भारताला अपयश आलं
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला.
वर्ल्डकप फायनलमध्ये घुसला पॅलेस्टाईनचा समर्थक
भारताचा डाव सुरु असताना 'फ्री पॅलेस्टाईन' असा मजकूर लिहिलेला टी-शर्ट घालून एक व्यक्ती मैदानात घुसला.
वर्ल्ड कप फायनलला केलेल्या सुरक्षाव्यवस्थेची चर्चा माध्यमांमध्ये केली जात असताना अशा पद्धतीने एक व्यक्ती मैदानात घुसल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
पॅलेस्टाईनचा झेंडा हातात घेतलेल्या या व्यक्तीने मैदानावर येऊन विराट कोहलीला आलिंगन देण्याचा प्रयत्न केला. मैदानावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.