अवघ्या क्रिकेट रसिकांचा श्वास रोखून धरलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आज सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडसंघाने ‘नियमानुसार’ विजय मिळवत विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विश्वचषक पटकावला. कमालीच्या चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यामध्ये दोन्ही संघानी निर्धारित ५० षटकांमध्ये २४१ धाव केल्याने हा सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला होता. नियमाप्रमाणे सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना अतिरिक्त षटकामध्ये १५ धावा केल्या. बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी प्रत्येकी ३ चेंडूंमध्ये अनुक्रमे ८ व ७ धावा फटकावत न्यूझीलंडसमोर १६ धावांचे आव्हान ठेवले होते.
क्रिकेटमध्ये आतापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारे, बरोबरीत सुटणारे अनेक सामने झालेत, यापुढेही रंगतील. पण कालची अंतिम लढत हा क्रिकेटमधील या थराराचा सर्वोच्च बिंदू होता. खरंतर आजच्या सुपरफास्ट क्रिकेटच्या जमान्यात 241 ही अतिसामान्य धावसंख्या मानली जाते. त्यामुळेच की काय 242 धावांचं आव्हान मिळाल्यावर ब्रिटिशांनी शँपेनच्या बाटल्या फोडण्याची तयारी सुरू केली होती. पण अत्यंत संयमी आणि चतुर कर्णधार असलेल्या केन विल्यमसनने घरच्या मैदानावर खेळत असलेल्या ब्रिटिशांच्या तोंडाला फेस आणला. निश्चित वाटणारा इंग्लंडचा विजय हळूहळू दुरापास्त वाटू लागला. पण शेवटच्या क्षणी इंग्रजांवर हा खेळ आणि नशीब मेहेरबान झाले आणि विश्वचषकाचे दान त्यांच्या हातात पडले. पण या लढतीत इंग्लिश संघ निर्विवादपणे जिंकला नाही आणि त्यांचा प्रतिस्पर्धी न्यूझीलंडचा संघ हा पराभूत झाला नाही, अशीच नोंद इतिहासात होईल, हीच या खेळाची खासीयत आहे.