न्यूझीलंड ‘विनर’; अफ्रिका ‘चोकर्स’

बुधवार, 25 मार्च 2015 (10:24 IST)
विजयाची परंपरा कायम राखत न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला धुळ चारली. या मॅचमध्ये न्यूझीलंड विनर ठरले तर दक्षिण आफ्रिकेवरच ‘चोकर्स’चा शिक्का कायम राहिला. किंबहून या शिक्का पुसून काढण्याची नामी संधी दवडल्याने अफ्रिकन खेळाडूंना मैदानावरच रडू कोसळले.
 
यजमान न्यूझीलंडला आपल्या ‘घरच्या’ मैदानावर खेळण्याचा फायदा झाला, असेच म्हणावे लागेल. कारण प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या दक्षिण अफ्रिकेला पावसाने चांगलीच साथ दिली होती. ३८ ओव्हरमध्ये २१६ धावा झाल्या असताना पाऊस आला. खेळ पुन्हा सुरु झाल्यानंतर पाच षटकांत आफ्रिकेनं ६५ वा कुटल्या आणि २८१ धावांपर्यंत मजल मारली. डुप्लेसिस, एबी डिविलियर्स आणि डेव्हीड मिलर यांच्या आतषबाजीनं ही किमया झाली. डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडला विजयासाठी ४३ षटकांतच २९८ धावांचं आव्हान दिले गेल्याने आपणच जिंकणार, अशाच भावनेने अफ्रिकन खेळाडू मैदानावर उतरले. पण, तुफानी फलंदाजी म्हणजे काय ते न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पहिल्या ५ ओव्हरमध्येच दाखवून दिले. कर्णधार मॅकलम, गप्टिल, कोरी अँडरसन आणि एलिआॅट या चौकडीनं त्यांचं स्वप्न चक्काचूर करून टाकलं. शेवटपर्यंत किल्ला लढवणारा आणि ७३ चेंडूत ८४ धावांची अफलातून खेळी करून विजयाचा षटका ठोकणारा एलिआॅट सामनावीर ठरला.

वेबदुनिया वर वाचा