भारत-पाक विश्वकप सामन्याची कॉमेंट्री करणार आहे बिग बी

मंगळवार, 3 फेब्रुवारी 2015 (12:32 IST)
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत, येत्या 15 फेब्रुवारीला होणार्‍या भारत-पाकिस्तान यांच्यातील महासंग्रामाचे महासमालोचन हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन करणार आहेत. स्वत: बिग बी अमिताभ बच्चन  यांनीच आपल्या या नव्या भूमिकेसंदर्भात घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, ते फक्त वर्ल्ड कपमधील 'महायुद्धा'पुरते अतिथी समालोचक वगैरे नाहीत, तर ते या नव्या क्षेत्रात पदार्पणच करातहेत. त्यामुळे 'बिग बीं'च्या भारदस्त आवाजात कॉमेंट्री ऐकत सामन्याचा आस्वाद क्रिकेटप्रेमींना लुटता येणार आहे. 
 
अमिताभ बच्चन यांचे क्रिकेटप्रेम सर्वश्रुतच आहे. टीम इंडियाचे सामने ते वेळात वेळ काढून पाहतातच, पण सामन्यादरम्यान ट्विटवरून त्यांची 'कॉमेंट्री'ही सुरू असते. भारत जिंकल्यास धोनीसेनेवर कौतुकाचा वर्षाव करणारे बिग बी, पराभवानंतर त्यांच्यावर टीकेचा भडिमार करण्याऐवजी त्यांना आधारच देतात. टीम इंडियाचे कट्टर पाठीराखे असलेले क्रिकेट वेडे अमिताभ आता स्टार स्पोर्ट्‍सवर समालोचन करण्यास सज्ज झालेत. 'श‍मिताभ' या आगामी चित्रपटाचे निर्माते आणि स्टार स्पोर्ट्‍सने सिनेमा आणि क्रिकेट चाहत्यांसाठी दुग्धर्शकरा योग जुळवून आणला आहे.

वेबदुनिया वर वाचा