इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा

सोमवार, 30 मार्च 2020 (09:40 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांनी घराकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना प्रवासी वाहन मिळत नसल्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गाने इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा झाले. यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, शहापूर आदी ठिकाणचे हे कामगार आहेत. यावेळी इगतपुरी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या गोरखपुर काशी एक्स्प्रेस मध्ये ही मंडळी जाऊन बसली आणि गाडी सोडण्याची मागणी केली. मात्र रेल्वे सेवा बंद असल्याने पुढील सुचना मिळेल तो पर्यंत सोडता येणार नाही असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
 
दरम्यान मुंबईकडून येणाऱ्यांची संख्या वाढत असून हे नागरिक सरळ महामार्गाने पायी प्रवास करुन कसारा घाटातून इगतपुरी येथे प्रवेश करीत आहेत. या ठिकाणी घाटनदेवी मंदिरा जवळील असलेल्या जिल्हाबंदी चेकपोस्ट वर एकच गर्दी झाली असून तैनात असलेल्या पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाची तारांबळ उडाली. आता सर्व वाहनांची कसुन चौकशी केली जात असून अत्यावश्यक वाहनांनाच नाशिकडे सोडले जात आहे. विनाकारण प्रवास करणाऱ्या वाहनांना पुन्हा मुंबईच्या दिशेने पाठवुन देण्यात येत आहे. मात्र या वाहनातील प्रवासी येथेच उतरुन थेट नाशिकच्या दिशेने भरऊन्हात पायी प्रवास करीत असल्याने प्रशासनाची धांदल ऊडाली आहे.
 
दुसरीकडे सोशल मीडियावर इगतपुरी येथे रेल्वेने काही नागरिक उतरल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने सोडलेल्या विशेष रेल्वेत बेकायदेशीर रित्या शिरलेल्या सुमारे ५०० प्रवाशांना इगतपुरी येथे रोखण्यात आले असून त्यांना जिल्हा प्रशासनाने परत पाठवले आहे. हे सर्व उत्तर भारतीय आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
 
रेल्वेने त्यांच्या मेंटेनन्स स्टाफसाठी एक गाडी सोडली होती. ज्यातून जवळपास ४०० ते ५०० अनधिकृत प्रवासी देखील प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी उत्तर प्रदेश येथे जाणार होती या सर्व प्रवाशांना रेल्वेने इगतपुरी रेल्वे स्टेशन येथे खाली उत्तर उतरवले. त्यानंतर हे सर्व प्रवासी शहरांमध्ये प्रवेश करणार होते. मात्र जिल्हा प्रशासनाने या सर्व प्रवाशांना पुन्हा रेल्वे स्टेशन मध्ये परत पाठवून दिले आहे. सध्या तलाठी पोलीस कर्मचारी ग्रामसेवक इत्यादी शासकीय कर्मचारी स्टेशन परिसरात तैनात करण्यात आले आहेत असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती