मागच्या 24 तासांत (24 ऑगस्टच्या दिवशी) देशांत 37,593 नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातही हा आकडा सात हजारांच्या आसपास आहे. म्हणजे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचंच हे चिन्ह आहे.
म्हणूनच राज्यसरकारनेही अलीकडेच लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक ठिकाणं उघडत आहेत. आयुष्य हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात होतेय.. पण त्यातच काही दिवसांपूर्वी बातमी आली की तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येऊ शकते.
खरंच तसं होणार आहे का? त्याबद्दल जाणकार, डॉक्टर आणि सरकारचं काय म्हणणं आहे? याचा आढावा घेऊया
ऑक्टोबरमध्ये देशात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे का?
राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्था म्हणजे NIDM या केंद्रीय गृह विभाभांतर्गत येणाऱ्या संस्थेने नुकताच एक अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द केलाय.
यात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यापर्यंत येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अहवालात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने 40 तज्ज्ञांशी बोलून केलेल्या सर्व्हेचा हवाला देण्यात आला आहे. या जाणकारांच्या सर्व्हेचा निष्कर्ष आहे की 15 जुलैपासून ते 13 ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट देशात येऊ शकते. तर नीती आयोगाचे आरोग्यविषयक समितीचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनीही पत्रकारांसमोर केलेल्या सादरीकरणात 10 ऑगस्टला हीच माहिती दिली होती.
जुलै ते सप्टेंबर दरम्यान तिसरी लाट येऊ शकते. आणि त्यासाठी आरोग्यविषयक उपाययोजना काय असायला पाहिजेत याचा त्यांनी केंद्रसरकारबरोबर आढावा घेतला. त्यांनी म्हटलं होतं की, "सप्टेंबरपासून तिसरी लाट सुरू होऊ शकते. आणि ही लाट शिखर गाठेल तेव्हा रुग्णसंख्या एका दिवसाला चार ते पाच लाख पर्यंत जाऊ शकते. वाढत्या रुग्णसंख्येसाठी देशभर 2 लाख ICU बेड्स उपलब्ध करावे लागतील. याशिवाय 5 लाख ऑक्सिजन बेड्स आणि 10 लाख विलगीकरण बेड्स तयार ठेवावे लागतील."
दुसरी लाट ओसरत असतानाच भारतातच नाही तर जगभरात कोरोना व्हायरस वेगाने बदलू लागला. या जनुकीय बदलांमुळे नव्याने तयार झालेला आणि अधिक संसर्गजन्य असलेले डेल्टा व्हेरियंट्स जगाला अधिक त्रासदायक ठरताहेत. त्यातच ऑगस्ट महिन्यापासून राज्य सरकारने मॉल्स, बागा, जिम्स यावरचे निर्बंधही हटवलेत. त्यामुळे गर्दी वाढायला लागलीय.
तिसऱ्या लाटेबद्दल जाणकार काय सांगतात?
डॉ. सौम्या स्वामिनाथन या जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ. त्यांच्याशी बीबीसीने तिसऱ्या लाटेच्या अंदाजाबद्दल संवाद साधला.
त्यांच्या मते कोरोना पँडेमिकचं आता एंडेमिक झालंय. पण, एंडेमिक म्हणजे लाट किंवा उद्रेक संपलाय असं नव्हे. तर कोरोना विषाणूबरोबर जगण्याची सवय लोकांना होणं. शरीराने विषाणूच्या संसर्गाशी जुळवून घेणं.
मग अशा वेळी देशातल्या संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,
"भारत खंडप्राय देश आहे आणि प्रत्येक राज्याची वेगळी वैशिष्ट्य आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यात कोरोनाविषयीची रोगप्रतिकारक शक्तीही वेगवेगळ्या प्रमाणात असणार आहे. अशावेळी तिसऱ्या लाटेचा धोका नाकारता येत नाही. पण त्याचं प्रमाण विविध राज्यांत आणि भागांत वेगवेगळं असेल. अख्ख्या देशालाच तिसऱ्या लाटेपासून धोका आहे, असं नाही. काही राज्यांमध्ये मात्र पुन्हा उद्रेक बघायला मिळू शकतो."
आताच्या गतीने देशात लसीकरण पूर्ण व्हायला 2022चा डिसेंबर उजाडेल, असंही स्वामिनाथन यांना वाटतं आणि तोपर्यंत कोरोना विषाणूसोबत रहावं लागू शकेल, असंही त्यांनी म्हटलंय.
लहानग्यांना खरंच जास्त धोका?
दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो लहान मुलांमधल्या संसर्गाचा. कारण, तिसऱ्या लाटेत मुलांनाच सर्वाधिक धोका असल्याचं काही डॉक्टरांनी म्हटलं होतं. त्याबद्दल डॉ. स्वामिनाथन यांनी घाबरण्याची काही गरज नसल्याचं म्हटलंय.
"आपण इतर देशांमधला अनुभव बघितलाय. अनेक सिरो सर्व्हे पाहिलेत. मुलांना जरी संसर्ग झाला तरी आजाराचं प्रमाण सौम्य असल्याचं आढळून आलंय. मुलांमधला मृत्युदरही अत्यंत कमी आहे. पण अनेक देशांमध्ये मुलांसाठी चांगली रुग्णालयं नाहीत, सोयी नाहीत. त्याची तयारी मात्र भारताने केली पाहिजे."
लहान मुलांना कोरोनाची लस देण्यावरही अजून निर्णय झालेला नाही. आणि डॉ. स्वामिनाथन यांनी हा निर्णय लशीच्या उपलब्धतेवर अवलंबून असल्याचं मान्य केलं असलं तरी हृदयविकार किंवा इतर कुठलेही आजार असलेल्या मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली तर हरकत नाही असा निर्वाळा दिला आहे.
देशभरात आणि राज्यातही महाविद्यालयं आणि खासकरून लहान मुलांच्या शाळा सुरू करण्याचा आग्रह होतोय आणि राज्यसरकारवर तसा दबावही आहे.
त्यामुळे शाळेविषयी निर्णय घेताना नक्कीच राज्यसरकारला तिसरी लाट आणि लहान मुलांना असलेल्या संभाव्य धोक्याची जाणीव ठेवावी लागणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन लहान मुलांच्या शाळेविषयी निर्णय घेणार असल्याचं म्हटलंय.
तिसऱ्या लाटेसाठी राज्यसरकार तयार आहे?
आतापर्यंत आपण पाहिलंय की लाटांबद्दलचे बरेचसे अंदाज चूक ठरले आहेत. दुसरी लाट कधी येईल आणि किती मोठी असेल हे आधी कुणी नेमकं सांगू शकलं नव्हतं. पण जर खरंच तिसरी लाट येणार असं जाणकार सांगत आहेत तर त्यासाठी राज्य सरकार तयार आहे का?
दोनच दिवसांपूर्वी (22 ऑगस्ट) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना तसा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी नीती आयोगाने तिसऱ्या लाटेविषयीच्या सूचना जून महिन्यातच राज्यांना केल्याचं स्पष्ट केलं.
आणि त्याचबरोबर संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी राज्यसरकार तयार असल्याचं सांगताना ते म्हणाले की, "काही आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाची भरती आवश्यक होती. तिथपासून ते औषधं, रुग्णालयात अतिरिक्त खाटा असा सगळ्या प्रकारचा बंदोबस्त राज्यसरकारने जिल्हा पातळीवर केला आहे. लहान मुलांची अधिक काळजी घेण्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये बालरोगतज्ज्ञांची उपलब्धता आहे ना यावरही विशेष भर देण्यात आला आहे."
तिसली लाट महाराष्ट्रात येईलच असा पक्का दावा कुणी केलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. आणि महाराष्ट्रात पुरेशा वेगाने लसीकरण सुरू असल्याचा दावा केला. आतापर्यंत अमेरिका, युरोप, इस्राईल, ऑस्ट्रेलिया, इराण आणि इतर काही देशांमध्ये तिसरी लाट आलेली आहे.
लसीकरण भरपूर झालेल्या देशांनाही तिसरी लाट त्रास देतेय. अशावेळी आपल्याला सावधच राहावं लागणार आहे. त्यासाठी गर्दीची ठिकाणं टाळणं आणि कोरोनाचे नियम पाळणं हेच आपल्या हातात आहे.