करोनापासून बचावासाठी ‘होम क्वारंटाइन’ किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाइन’ हे दोनंच पर्याय उपलब्ध आहेत. करोना संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाइन’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाइन’ व्हावं, स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं,” असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. “जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
“करोनाबाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. भाजी बाजारातल्या गर्दीमुळे करोना तुमच्या घरात पोहचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. करोना संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल. त्याची सुरुवात झाली आहे,” असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.