काय म्हणता, नोव्हेंबरमध्ये करोना रुग्णांची संख्या उच्चांक गाठणार

सोमवार, 15 जून 2020 (09:33 IST)
येत्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीमध्ये देशातील करोना रुग्णांची संख्या उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात आयसीयू बेड व व्हेटिंलेटर्सचा तुटवडा जाणवू शकतो. भारतीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) एका अभ्यास गटाच्या माध्यमातून पाहणी केली, त्यातून ही गोष्ट समोर आली आहे.
 
देशातील करोनाचा ज्वर अजूनही कमी झालेला नाही. लॉकडाउनमुळे काही प्रमाणात करोनाच्या प्रसारावर परिणाम झाला होता. मात्र, लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढू लागली आहे. मागील काही दिवसांपासून देशात दिवसाला सरासरी १०,००० जवळपास रुग्ण आढळून येत आहे. दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीमध्ये करोनाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
 
 देशातील करोनाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आयसीएमआरनं संशोधकांचा समावेश असलेला ऑपरेशन रिसर्च ग्रुप स्थापन केला होता. देशात नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीला करोना रुग्णांची संख्या उच्चांक गाठू शकते. या काळात आयसीयू बेड व व्हेटिंलेटर्सचा तुटवडा जाणवू शकतो, असं या ग्रुपनं केलेल्या अभ्यासात म्हटलं आहे. देशात लागू करण्यात आलेल्या आठ आठवड्यांच्या लॉकडाउनमुळे, त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीनं करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे उच्चांक गाठण्याचा कालावधी ३४ ते ७४ दिवस लांबला आहे. त्यामुळे संक्रमणाची संख्या ६९ ते ९७ टक्क्यांनी कमी करण्यास मदत झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यास वेळ मिळाला आहे,”असं या अभ्यासात म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती