दुसरा डोस मिळायला उशीर झाला तर काय होईल?

शनिवार, 1 मे 2021 (13:37 IST)
तुम्ही कोरोना लशीचा दुसरा डोस घ्यायला गेलात आणि तिथे लस मिळालीच नाही तर...? दुसरा डोसला उशीर झाला तर...? किंवा मिळालाच नाही तर...? पहिल्या डोसमुळे तुम्ही सुरक्षित आहात का?
 
तुमच्या मनातील याच प्रश्नांचा बीबीसी मराठीनं तज्ज्ञांशी बोलून उत्तरं शोधली आहेत.
 
भारत सरकारने 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरच्या सगळ्यांचं लसीकरण सुरू केलं खरं, पण वस्तुस्थिती ही आहे की, अनेक केंद्रांवर सध्या 'लस उपलब्ध नाही' असे बोर्ड झळकत आहेत.
 
मुंबईत तर अधिकृतपणे तीन दिवस सगळ्या केंद्रांवर लसीकरण बंद आहे. पुरेशा लशी राज्यात पोहोचलेल्या नाहीत. अशावेळी ज्यांचा लशीचा पहिला डोस झालाय, त्यांची अडचण झालीय की, दुसरा डोस त्यांना वेळेवर मिळत नाहीय.
 
लशीचा एक डोस कोरोनाविरोधात किती परिणामकारक?
लशीच्या दुसऱ्या डोसला 'बूस्टर डोस' असं म्हटलं जातं. म्हणजे पहिल्या डोसला पूरक आणि वर त्याची ताकद वाढवणारा डोस.
 
हा पहिला डोस कोरोनाचा निम्मा धोका कमी करतो, असं युकेमध्ये झालेलं एक संशोधन सांगतं. युकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ऑक्सफर्डची कोव्हिशिल्ड लस आणि फायझर लशीवर हे संशोधन केलं. आणि त्यातले निष्कर्ष असं सांगतात की -
 
या लशी घेतल्यानंतर 3 आठवड्यांमध्ये या व्यक्तीकडून इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता 38 ते 49 टक्क्यांनी कमी होते.
लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी त्या व्यक्तीला कोरोनापासून संरक्षण मिळालं.
लस घेतलेल्या व्यक्तीला आजाराची लक्षणं दिसण्याची शक्यता 4 आठवड्यांनंतर 60 ते 65 टक्क्यांनी कमी झाली.
 
तज्ज्ञांच्या मते, लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर अँटीबॉडी तयार व्हायला दोन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे काही केसेसमध्ये लोकांना मधल्या काळात कोव्हिड झाला असला तरी घाबरण्याचं कारण नाही. एकतर अशा रुग्णांची लक्षणं सौम्य होती. त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका कमी झाला होता.
 
नानावटी रुग्णालयाचे संसर्गजन्य आजारांविषयीचे तज्ज्ञ डॉ. राहुल तांबे याविषयी सांगतात, "लशीचा पहिला डोस हा रोगाविषयीची प्रतिकारक शक्ती शरीरात जागवण्याचं काम करतो. त्यामुळे शरीरात अँटिबॉडीज् तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. पण, दुसरा डोस ही प्रक्रिया अधिक वेगवान करतो. त्यामुळे अँटीबॉडीज आणि प्रतिकार शक्ती काम करण्याचं प्रमाण वाढतं. तेव्हा पहिला डोस संसर्गाचा धोका कमी करत असला तरी दुसरा डोसही आवश्यक आहे."
 
पण काही कारणांनी दुसऱ्या डोसला उशीर झाला तर..? सध्या महाराष्ट्रात लस उपलब्ध होत नाहीत, तर काहींना इतर काही वैद्यकीय कारणांमुळे दुसरा डोस शक्य झालेला नाही.
 
इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल असलेले लोकही दुसरा डोस घेऊ शकलेले नाहीत.
 
दुसऱ्या डोसला उशीर झाला तर काय करायचं?
कोविन डॅशबोर्ड पाहिलात तर लगेच लक्षात येईल 29 एप्रिल पर्यंत देशात 14 कोटी 93 लाख लशींचे डोस दिले गेलेत. पण यातले 12 कोटी 38 लाख डोस हे पहिले डोस आहेत. फक्त 2 कोटी 54 लाख लोकांचे दोन्ही डोस झालेत.
 
महाराष्ट्रात तर 1 कोटी 32 लाख लोकांचा एक डोस झालाय. पण दोन्ही डोस झालेल्यांची संख्या आहे 25 लाख 12 हजार 396.
 
साधारणपणे चार ते सहा आठवड्यात दुसरा बूस्टर डोस घ्यावा, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. पण आता लसच उपलब्ध नसल्यामुळे उशीर झाला तर काय करायचं हा प्रश्न बीबीसी मराठीने जे जे रुग्णालयाचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांना विचारला.
 
त्यांच्या मते, "कुठल्याही लशीचा दुसरा डोस कधी घ्यायचा हे ही संशोधकांनी सांगितलेले असते. कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस हा तीन महिन्यांपर्यंत घेतला तरी चालतो. कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस चार आठवड्यांनंतर घ्यायचा आहे. त्यात दोन आठवडे उशीर झाला तरी चालेल. सध्या लस उपलब्ध नसल्यामुळे वेळ जास्त लागतो आहे. पण ज्यांना पहिला डोस दिलाय त्यांना प्राधान्यक्रमाने दुसरा डोस देण्यात येईल. त्यामुळे त्यांनी भीती बाळगू नये."
 
दुसरा डोस वेळेत मिळालाच नाही तर...?
सध्या भारतात दिल्या गेलेल्या 95% लसी या कोव्हिशिल्डच्या आहेत, तर 5% लसी कोवॅक्सिनच्या. पण दोन्ही लशींचा तुटवडा महाराष्ट्रात जाणवतोय. आरोग्य विभागाच्या धोरणानुसार, एकाच लशीचे दोन डोस देणं गरजेचं आहे.
 
अशावेळी तुम्हाला हवी असलेल्या लशीचा दुसरा डोस मिळालाच नाही तर? किंवा तुम्हाला दुसरा डोस घेताच आला नाही तर काय होईल तज्ज्ञ डॉक्टरांकडून शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.
 
डॉ. तात्याराव लहाने यांच्या मते, "पहिल्या डोसनंतर शरीरात अँटीबॉडी तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे फारसं घाबरण्याचं कारण नाही."
 
तर याविषयी डॉ. राहुल तांबे यांनी थोडं सावध मत व्यक्त केलं आहे.
 
डॉ. तांबे म्हणतात, "तुम्ही दुसरा डोस घेतला नाही तर पहिल्या डोसमुळे मिळणारं संरक्षण हे कमी आहे. अशा परिस्थितीत पहिला डोस झाल्यानंतरही तुम्हाला कोरोना संसर्ग होण्याचा धोका राहतो. पण संपूर्ण संरक्षणासाठी दुसरा डोस आवश्यक आहे. संशोधनात असं समोर आलंय की, दुसऱ्या डोसनंतर कोरोना झाला तरी त्यातला संसर्ग कमी असतो, लक्षणं सौम्य असतात."
 
आताशी दुसरी लाट सुरू झालीय, तेवढ्यात तिसऱ्या लाटेचे अंदाज बांधायला सुरुवात झालीय.
 
येणाऱ्या काळात कोरोना परिस्थिती आटोक्यात आणायची असेल तर लस हा एक प्रभावी उपाय आहे. लसीकरणाला गती मिळाली तर पुढच्या लाटा आटोक्यात आणता येतील. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावणं हे नियम पाळायलाही विसरू नका.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती