भारतात आढळणारा घातक आणि वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची बाधा जिल्ह्यातील सात रुग्णांना झाल्याचे समोर आले आहे. सर्व रुग्ण विनालक्षण असून त्यांच्यावर घरीच उपाचर करण्यात आले असून ते बरे झाले आहेत. बाधित रुग्णांपैकी कोणीही कोरोनाची लस घेतलेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.
मेच्या दुसऱ्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातून १०० नमुने गोळा करून जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ७ जणांना डेल्टा प्लस व्हेरिएंटची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सातही रुग्ण जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये आढळले आहेत. २० ते ५२ वयोगटातील हे रुग्ण आहेत. त्यांचा प्रवासाचा कोणताही इतिहास आढळला नसला तरी त्यांच्यापैकी जवळच्या व्यक्तींचा शेजारील राज्यांमध्ये प्रवास झाल्याचे पुढे आले आहे.
सर्व रुग्णांना डेल्टा प्लस व्हेरिएंटची बाधा झाल्याचे कळविले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या १६५ जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी दोघे कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोन्ही बाधितांमध्ये लक्षणे आढळलेली नाहीत. त्यांचे नमुने सुद्धा जिनोम सिक्वेंन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले
.
कोविडच्या दुसऱ्या लाटे दरम्यान मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात १२ हजार सक्रिय रुग्ण होते. गेल्या वर्षी आलेल्या पहिल्या लाटेच्या तुलनेत ४ हजार रुग्ण अधिक होते. सध्या १३०० सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात कोरोना लसीचा खूपच कमी परिणाम दिसत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. परंतु त्यातल्या त्यात दिलासादायक बाब हीच आहे की, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर गंभीर संसर्ग आणि मृत्यू टाळता येऊ शकतो.