राज्य सरकारकडून पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू

मंगळवार, 16 मार्च 2021 (07:55 IST)
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सिनेमागृहांमध्ये केवळ क्षमतेच्या ५० टक्केच लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर राज्यात कोणत्याही राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
 
राज्यात विवाह सोहळ्यांना गर्दी होत असल्याचं निदर्शनास आल्यानं पुन्हा एकदा उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. राज्यात आता विवाह सोहळ्यास फक्त ५० जणांना उपस्थित राहता येणार आहे. तर अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांना उपस्थित राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातील इतर सर्व कंपन्यांमध्ये क्षमतेच्या ५० टक्केच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची परवानगी असणार आहे. याशिवाय राज्यातील धार्मिक स्थळांवर भाविकांची मर्यादा व्यवस्थापनाला पाळावी लागणार आहे. यासाठी दर तासाभरात मर्यादीत भाविकांना परवानगी देण्याची व्यवस्था धार्मिक स्थळांनी करावी आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
असे आहेत नवे निर्बंध
>>  राज्यातील सिनेमागृह, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये क्षमतेच्या केवळ ५० टक्के उपस्थितीला परवानगी
>> राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यकम व सभांना बंदी
>> विवाह सोहळ्यांना केवळ ५० जणांना उपस्थित राहता येणार
>> अंत्य संस्कारासाठी केवळ २० जणांना उपस्थित राहता येणार
>>आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कंपन्यांमध्ये क्षमतेच्या केवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास परवानगी
>> धार्मिक स्थळं आणि ट्रस्ट यांना दर तासाचे नियोजन करुन भाविकांची संख्या मर्यादित ठेवण्याचं व्यवस्थापन करण्याचे आदेश

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती