कोरोना लशीच्या फॉर्म्युल्यावरून 'या' दोन कंपन्यांमध्ये भांडण

शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (13:51 IST)
कोरोना लस विकसित करण्यासंदर्भात स्वामित्व हक्कांच्या उल्लंघनावरून मॉडर्ना कंपनीने फायझर आणि त्याची जर्मन भागीदार कंपनी बायोएन्टेक कंपनीवर दावा ठोकला आहे.
 
कोरोना संकटापूर्वी mRNA तंत्रज्ञान विकसित केलं असल्याचा दावा अमेरिकेतील बायोटेक कंपनीने केला आहे. किती रुपयांचा दावा ठोकला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण अमेरिका आणि जर्मनीत या दोन कंपन्यांविरोधात मॉडर्नाने खटला दाखल केला आहे.
 
यासंदर्भात खटला दाखल करण्यात आल्याने धक्का बसल्याचं फायझर कंपनीने म्हटलं आहे. मॉडर्नाने केलेल्या दाव्याला आम्ही न्यायालयात आव्हान देऊ आणि आमच्या कामाचा बचाव करू असं फायझर कंपनीने स्पष्ट केलं.
 
फायझर आणि बायोएन्टेक या कंपन्यांनी लस निर्मिती प्रक्रियेतील बौद्धिक मालमत्तेतील दोन महत्त्वाच्या घटकांची उचलेगिरी केल्याचं मॉडर्ना कंपनीने म्हटलं आहे. पहिला मुद्दा केमिकल मोडिफिकेशनचा आहे. आमच्या शास्त्रज्ञांनी 2015 मध्ये मानवी चाचणी घेऊन हे सिद्ध केलं होतं असं मॉडर्नाचं म्हणणं आहे.
 
दुसरा मुद्दा आहे दोन्ही लशी प्रथिनांना कशा प्रकारे लक्ष्य करतात.
 
अनोखं असं mRNA तंत्रज्ञान आम्ही विकसित करण्यासाठी आम्ही कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. त्याचे स्वामित्व हक्क मिळवले असं मॉडर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफान बान्सेल यांनी सांगितलं.
 
mRNA लस काय आहे?
2010 मध्ये स्थापना झालेली मॉडर्ना कंपनी ही mRNA तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या सुरुवातीच्या कंपन्यापैकी एक आहे. कोरोना लशींमध्ये पहिल्यांदा व्यावसायिक पातळीवर या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला.
रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी मेसेंजर आरएनए नावाच्या अनुवांशिक कोडचा रेणू वापरतात. विषाणूचा हल्ला झाल्यानंतर प्रतिकार करण्यासाठी शरीराला तयार करण्यास ते मदत करतं.
 
कोरोना संकट काळात अन्य कंपन्यांना लस विकसित करताना विशेषत: आर्थिकदृष्ट्या मागास आणि मध्यमपातळी आर्थिक गटाच्या देशांना मॉडर्नाने पेटंट लागू केलं नाही.
 
मार्च 2022 मध्ये मॉडर्नाने म्हटलं की विकसित देशांमध्ये फायझर आणि बायोएन्टेक कंपन्यांनी आमच्या स्वामित्व हक्काचा मान राखावा. परंतु आधी झालेल्या घडामोडींसाठी खटला दाखल करणार नाही असं मॉडर्नाने स्पष्ट केलं.
 
नवं तंत्रज्ञान विकसित होताना स्वामित्व हक्काचा वाद निर्माण होतो. फायझर/बायोएन्टेक आणि मॉडर्ना यांच्यात mRNA तंत्रज्ञानावरून वाद सुरू आहे.
 
मॉडर्ना कंपनीचा यावरूनच अमेरिकेतील युएस नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थशी झगडा सुरू आहे.
 
जुलै महिन्यात जर्मनीतील क्युअरव्हॅक कंपनीने बायएन्टेक कंपनीविरोधात याच तंत्रज्ञानासंदर्भात खटला दाखल केला. कंपनीने नुकसानभरपाईची मागणी देखील केली.
 
मॉडर्ना कंपनीने दाखल केलेल्या खटल्याचा अभ्यास केलेला नाही असं फायझर कंपनीतर्फे सांगण्यात आलं. परंतु आम्ही आमच्या बौद्धिक संपदेनुसार लशीची निर्मिती केली आहे असं फायझरने म्हटलं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती