राज्यात ८ जानेवारीला सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा ड्राय रन

मंगळवार, 5 जानेवारी 2021 (16:11 IST)
राज्यात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे सध्या आठ रुग्ण असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नव्या प्रकाराची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी कोणी पॉझिटिव्ह नसल्याची दिलासादायक माहितीही यावेळी त्यांनी दिली. आयसीएमआरच्या प्रोटोकॉलचं आपण सक्तीने पालन करत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात ८ जानेवारीला सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची ड्राय रन होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
 
राजेश टोपे यांनी यावेळी जनतेने जागरुक राहावं, घाबरण्याचं कारण नाही. चिंता करु नका पण काळजी घ्या असं आवाहन केलं. “व्हायरसचा हा नवा प्रकार जास्त संसर्गजन्य आहे. ७० टक्के अधिक झपाट्याने संसर्ग होऊ शकतो. काळजी घ्यावी, सजग राहावं इतकंच महत्वाचं आहे,” असं त्यांनी सांगितलं.
 
“७ जानेवारीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत आमची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग होणार असून अनेक मुद्दे मांडणार आहेत. ज्या त्रुटी वाटत आहेत त्याबद्दल देखील सांगणार आहोत. ८ तारखेला प्रत्येक जिल्ह्यात ड्राय रन करणार असून त्याच्यातून आपली यंत्रणा तपासली जाईल. यामध्ये काही त्रुटी वैगेरे आहेत का? पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यात समन्वय आहे का? याचीही पाहणी होईल. ज्यावेळी आपण लसीकरणाचा कार्यक्रम राबवू त्यावेळी कोणतीही अडचण न येता कार्यक्रम राबवता यावा यादृष्टीने हे सर्व करणार आहोत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती