होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी

शुक्रवार, 3 जुलै 2020 (08:41 IST)
सरकारने कोरोनाच्या अत्यंत सौम्य लक्षण, पूर्व लक्षणात्मक आणि लक्षण नसलेल्या प्रकरणांच्या संदर्भात होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. फक्त अशाच रुग्णांना, ज्यांना डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल न करण्यास सांगितलं आहे, त्यांनाच होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल, असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटलं आहे. जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसलेले रुग्ण ज्यांना इतर कोणताही आजार नाही अशा रुग्णांवर घरीच उपचार केले जाऊ शकतात, परंतु यासाठी प्रथम डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागेल.
 
 मार्गदर्शक सूचनेमध्ये असं नमूद केलं आहे की जर होम आयसोलेशमध्ये असणाऱ्या एखाद्या रुग्णाला श्वास घेण्यात त्रास होत असेल. जर छातीत दुखायला सुरू झालं किंवा बोलताना त्रास होत असेल तर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल व्हावं लागेल. एवढेच नव्हे तर ६० वर्षांवरील रूग्णांना रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील. इतकेच नव्हे तर ज्यांना मधुमेह, हायपर टेन्शन, कर्करोग, मूत्रपिंड, फुफ्फुसांशी संबंधित गंभीर आजार आहेत, त्यांच्यावर रूग्णालयातच उपचार करावे लागणार आहेत. होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या व्यक्तिला कुटुंबातील सदस्यांपासून अलिप्तच रहावं लागेल, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती