'कोरोनाची साथ लवकर संपणार नाही' - WHO चे प्रमुख

मंगळवार, 13 एप्रिल 2021 (18:11 IST)
"सार्वजनिक आरोग्यासाठी पावलं उचलून काही महिन्यांसाठी कोरोनाची साथीवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. मात्र, कोरोनाचा विषाणू जाणार नाही," असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी दिला आहे.
 
ते म्हणाले, "भलेही संपूर्ण जगात आतापर्यंत कोरोना लशीचे 78 कोटी डोस देण्यात आले असतील, पण ही साथ पूर्णपणे संपण्याची चिन्हं नाहीयेत,"
 
2019 च्या डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा विषाणू जगभर पसरला. आतापर्यंत जगातील 13.65 कोटी लोकांना कारोनाची लागण झाली आहे आणि 29 लाखांहून अधिक लोकांचा जीव कोरोनानं घेतला आहे.
 
टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांच्या मते, "जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सलग सहा आठवड्यांपर्यंत कोरोनाच्या केसेसमध्ये घट झाली. मात्र, गेल्या आठवड्यापासून कोरोनाची साथ पुन्हा वेगानं पसरत आहे आणि गेल्या चार आटवड्यांपासून कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्याही वाढलीय. गेल्या आठवड्यात तर कोरोनाची लागण झालेल्यांची विक्रमी संख्या नोंदवली गेली. आशिया आणि मध्यपूर्वमधील काही देशांमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे."
 
जिनिव्हात एका संवादादरम्यान टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले की, "कोरोनाशी लढण्यासाठी लस हे महत्त्वाचं शस्त्र नक्कीच आहे. मात्र, असं होऊ शकत नाही की, या शस्त्राने कोरोनाच्या साथीचा पराभव होईल."
 
"सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं, वारंवार हात स्वच्छ धुणं आणि हवेशीर जागी राहणं याच गोष्टी या साथीविरोधात प्रभावीपणे काम करतात. सर्व्हेलन्स, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आयसोलेशन आणि समजूतदारपणे एकमेकांची काळजी घेणं या गोष्टी केल्यास साथीला रोखलं जाऊ शकतं आणि जीव वाचवले जाऊ शकतात," असं ते म्हणाले.
 
टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले, सार्वजनिक आरोग्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांमध्ये समानता नाही. त्यामुळे प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे आणि लोकांचा जीव जात आहे.
 
"कोरोना म्हणजे काहीतरी साधासुधा फ्लू आहे, असं समजणं लोकांनी बंद करावं. कारण या विषाणूने तरुण आणि निरोगी लोकांचाही जीव घेतलाय," असा इशाराही त्यांनी दिला.
 
"जे लोक कोरोनामुक्त झाले, त्यांच्यावर या आजाराचा काही दूरगामी परिणाम होईल का, याबाबत अद्याप काहीही स्पष्टत नाही. काही लोकांना वाटतं की, आपण तरूण आहोत आणि आपल्याला कोरोना झाला तर काही फरक पडत नाही," असंही ते म्हणाले.
 
'कोरोनाची साथ एवढ्यात संपणार नाही'
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हटलं की, "आशा पल्लवीत ठेवण्यासाठी जगाकडे अनेक कारणं आहेत. मात्र, कोरोनाची साथ एवढ्यात संपणार नाही, हे आपण समजून घेणं आवश्यक आहे."
 
"यावर्षी (2021) च्या सुरुवातीला कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली होती. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही कमी झाली होती. यावरून या साथीवर नियंत्रण मिळवणं शक्य असल्याचं दिसलं. तसंच, या साथीच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्सना पसरण्यापासून थांबवलं जाऊ शकतं. मात्र, हे कधी शक्य आहे, तर सार्वजनिक आरोग्याशी संबंधित योग्य पावलं उचलली आणि लसीकरणावर जोर दिला तर. मात्र, हे आपण असं करतोय की नाही, हा आपला वैयक्तिक निर्णय असतो किंवा सरकार आपल्यासाठी निर्णय घेत असतं," असं टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले.
 
"जागतिक स्तरावर ज्या वेगानं लशीचं उत्पादन केलं जात आहे, ते पाहता सर्व देशांपर्यंत लवकरात लवकर आणि समान पद्धतीनं लस पोहोचणं अशक्य आहे. जे देश कोरोनाची लस उत्पादित करण्यास इच्छुक आहेत, ते जागतिक आरोग्य संघटनेची मदत घेऊ शकतात," असं टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती