पिंपरी-चिंचवड शहरात एकाच कुटुंबातील १८ जणांना करोनाची लागण झाली होती. यांपैकी, तीनही सख्या भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती संबंधित कुटुंबाच्या नातेवाईकांनी दिली. मृत्यू झालेल्या तिन्ही भावांचे वय ६० वर्षांच्या पुढे होते.
पोपटराव कलापुरे (वय ६६), ज्ञानेश्वर कलापुरे (वय ६३) आणि दिलीपराव कलापुरे (वय ६१, सर्वजण रा. पिंपरी) असे करोनामुळे मृत्यू झालेल्या तीन सख्ख्या भावंडांची नावे आहेत. त्यांच्यावर १५ दिवसांपासून चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
कलापुरे कुटुंबामध्ये एकूण १८ सदस्य असून ते एकत्रित राहतात. त्यात मोठ्या तेरा व्यक्ती असून पाच लहान मुले आहेत. पैकी, एकाला पाच जुलै रोजी करोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार इतर कुटुंबातील सदस्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात सर्वच १८ जण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सर्वजण तातडीने चिंचवड येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले. त्यानंतर काही दिवसांनी यांपैकी १५ जणांना सौम्य लक्षण असल्याने डिस्चार्ज देण्यात आला.