पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ हिंदुत्वावादी, कट्टर सावरकर विचारवंत, भागवताचार्य वासुदेव नारायण उत्पात (८०) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. संत साहित्य, सावरकर साहित्यांवर त्यांचा गाढा अभ्यास होता, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे ते सदस्य होते. ते पंढरपूरचे राहणारे आहेत.
वा. ना. उत्पात हे गेल्या ३३ वर्षापासून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे चातुमार्सात भागवत सांगत आहेत. श्रीमदभागवताचा हा अखंड ज्ञानयज्ञ ३३ वर्षे अविरतपणे त्यांच्या हातून सुरू आहे. तसेच चातुमार्सात त्यांची ज्ञानेश्वरी प्रवचने देखील अनेक वर्षे सुरु होती. ते रुक्मिणी मातेचे वंशपरंपरागत पुजारी होते. गेल्या ३९ वर्षे त्यांनी कवठेकर प्रशाला पंढरपूर थे संस्कृत, मराठी, इंग्रजी, इतिहास या विषयाचे अध्यापन केले. त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात श्रीमदभागवत, रुक्मिणी स्वयंवर, ज्ञानेश्वरी यांचे सप्ताह, प्रवचने केली. विविध विषयांवर व्याख्याने देत. पंढरपुरातील समाजकारण,राजकारण या मध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. ते २५ वर्षे नगरसेवक आणि २ वर्षे नगराध्यक्ष होते.